विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर भारत बांगलादेशविरुद्ध आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळेल. या ऐतिहासिक सामन्यासाठी कोलकाता शहर सज्ज झालेलं आहे. भारतीय संघानेही या सामन्यासाठी कसून सराव केलाय, या सामन्याआधी विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. या कसोटी सामन्यात पहिलं सत्र महत्वाचं ठरेल असं विराटने स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“याआधी इडन गार्डन्स मैदानावर आम्ही विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळलो होतो. त्यावेळी मैदानात एक वेगळच वातावरण होतं, सध्या मी तशाच प्रकारचं वातावरण अनुभवतो आहे. गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनाही चाहते तितकाच पाठींबा देतील. माझ्यामते पहिलं सत्र हे अधिक महत्वाचं ठरणार आहे, भारतीय क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही सर्व जण या क्षणाचे साक्षीदार होणार आहोत याबद्दल आम्हाला गर्व आहे.” विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या.

याचसोबत इडन गार्डन्सची खेळपट्टी आणि गुलाबी चेंडू हे देखील महत्वाचे मुद्दे ठरणार असल्याचं विराटने स्पष्ट केलं. आम्हाला जे निर्णय घ्यायचे आहेत ते लवकर आणि योग्य घ्यावे लागतील. बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये लवकर येईल, त्यामुळे झेल घेतानाही अधिक सजग रहावं लागणार आहे. आमच्यासाठी हे एका प्रकारचं आव्हान आहे, आणि एक संघ म्हणून आम्ही त्यासाठी तयार आहोत, असंही विराट म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 2nd test 1st session will be important in day and night test says indian captain virat kohli psd
First published on: 21-11-2019 at 19:24 IST