जलदगती गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने कोलकाता कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर संपवला. इशांत शर्माने पहिल्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला. त्याला उमेश यादवने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – Video : उडता पंजाब नाही उडता ‘हिटमॅन’ ! रोहितने घेतलेला अफलातून झेल एकदा पाहाच

अबु जायेदच्या स्वरुपात बांगलादेशचा अखेरचा फलंदाज माघारी परतला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने त्याचा झेल घेतला. मात्र यादरम्यान मैदानावर घडलेलं नाट्य हे पाहण्यासारखं होतं. जायेदच्या बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या दिशेने चेंडू गेला, मात्र त्याच्या हाताला लागून चेंडू वर उडाला आणि शेजारी पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पुजाराने तो झेल टिपत बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला.

आपला पहिला-वहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. केवळ ३८ धावांत बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतला. बांगलादेशचा तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज शून्यावर माघारी परतला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरचा फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे. याआधी २००५ साली झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात असा प्रसंग घडला होता. यानंतर तब्बल १४ वर्षांनी भारतीय गोलंदाजांनी या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

अवश्य वाचा – Video : ‘सुपरमॅन’ वृद्धीमान साहा ! टिपला थरारक झेल