भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात आपली चमक दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय कसोटीत आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या वृद्धीमान साहाने महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. बांगलादेशचा सलामीवीर शादमान इस्लामचा झेल साहाने यष्टींमागे पकडत धोनीच्या सर्वात कमी कसोटी सामन्यांत शंभर बळी घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

अवश्य वाचा – IND vs BAN : घरच्या मैदानावर साहाची विक्रमी कामगिरी, धोनीशी केली बरोबरी

याच सामन्यात पहिल्याच डावात साहाने यष्टींमागे सुपरमॅनलाही लाजवेल असा एक झेल पकडला. बांगलादेशच्या आघाडीच्या फळीतले फलंदाज माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी काहीकाळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्नही फोल ठरले. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर मेहमद्दुलाच्या बॅटची कड घेऊन विराट कोहलीच्या दिशेने जाणारा चेंडू साहाने उडी मारत एका हातात पकडला. त्याच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

याच सामन्यात रोहित शर्मानेही अशाच पद्धतीने एक झेल पकडत सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. बांगलादेशच्या आघाडीच्या फळीतले ३ फलंदाज हे भोपळाही न फोडता माघारी परतले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रावर आपलं वर्चस्व गाजवत बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं.

अवश्य वाचा – Video : उडता पंजाब नाही उडता ‘हिटमॅन’ ! रोहितने घेतलेला अफलातून झेल एकदा पाहाच