भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टी टणक असल्यामुळे फलंदाजांना मदत मिळेल या आशेने बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चौथ्या डावात खेळपट्टी कशी असेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पण खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे पहिले फलंदाजीचा निर्णय घेण्यात आल्याचेही मोमिनुल म्हणाला.

नाणेफेक गमावल्यानंतर बोलताना विराट म्हणाला की खेळपट्टीवर थोडंसं गवत आहे. इंदूरची खेळपट्टी पहिल्या दिवशी थोडी आक्रमक असते. त्यामुळे आम्हाला पहिल्या दिवशी गोलंदाजी अजिबात करायची नव्हती. आम्ही संघात ३ वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. कारण दुसऱ्या दिवसापासून खेळपट्टील गोलंदाजीला काहीशी पोषक होईल असा आमचा अंदाज आहे. आमच्या कसोटी संघात फिरकीपटू शहाबाझ नदीमला विश्रांती देण्यात आली असून इशांत शर्माचे संघात पुनरागमन झाले आहे.

भारत-बांगलादेश मालिकेतील पहिला कसोटी सामना हा लाल चेंडूने खेळवण्यात येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २४० गुणांसह अग्रस्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारताशी सामना करणे हे बांगलादेशसाठी आव्हानात्मक ठरेल.

भारताकडे विराट कोहली (२६ शतके), अजिंक्य रहाणे (११ शतके), चेतेश्वर पुजारा (१८ शतके) यांच्यासारखे कसोटी क्रिकेटमधील मातब्बर फलंदाज आहेत. तसेच रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल ही नवी धडाकेबाज सलामीवीर जोडीही आहे. तसेच मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा आहे. याशिवाय अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवण्यापेक्षा इशांत शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे.