भारतीय संघ शुक्रवारपासून (२२ नोव्हें) पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. बांगलादेशच्या भारत दौऱ्यातील अंतिम टप्पा म्हणजेच हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. भारत आणि बांगलादेश या दोनही संघांसाठी हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेशचे खेळाडू गुलाबी चेंडूने सराव करत आहेत. पण केवळ खेळाडूंनीच सराव करणे पुरेसे नसून पंचांनीदेखील या कसोटीसाठी सराव करावा, असा सल्ला अनुभवी पंच सायमन तॉफेल यांनी दिला आहे.

“अ‍ॅडलेडवर पहिल्यांदा गुलाबी चेंडूच्या कसोटीच्या वेळी मी उपस्थित होतो. सायंकाळनंतर एकदा अंधार पडला की चेंडू पाहणं फक्त फलंदाजांसाठीच नव्हे, तर पंचांसाठीही कठीण आणि आव्हानात्मक होते. तसेच चेंडूचा रंग नवा असणार आहे. त्यामुळे पंचांनी क्रिकेट सरावात भाग घेण्याची गरज आहे”, असा सल्ला सायमन तॉफेल यांनी दिला.

IND vs BAN : दिवस-रात्र कसोटीआधी टीम इंडियासाठी ‘गुड-न्यूज’

“अंधार पडल्यानंतर प्रकाशायोजनेत बदल होईल. प्रखर सुर्यप्रकाशाऐवजी दिवे (फ्लडलाईट्स) लावले जातील. तेव्हा चेंडू दिसणे साऱ्यांसाठीच आव्हानात्मक असेल. अशा वेळी चेंडू स्पष्ट पाहण्यासाठी पंच कृत्रिम लेन्स वापरू शकतात. चेंडूला वेगळ्या पद्धतीने पाहण्यासाठी लेन्सचा वापर करता येतो किंवा नाही याची मला कल्पना नाही. ती बाब पंचांवर अवलंबून आहे. मात्र त्यांना जितके शक्य होईल, तितके त्यांनी नेट सरावात सहभागी व्हावे”, असे तॉफेल यांनी सांगितले.

IND vs BAN : पाण्यात चेंडू बुडवून दिवस-रात्र कसोटीचा सराव

दरम्यान, भारत-बांगलादेश यांच्यातील या सामन्यासाठी कोलकाता शहर गुलाबी रंगात न्हाऊन निघाले आहे. कोलकातातील रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत सगळीकडे गुलाबी वातावरण पाहायला मिळत आहे. संघटनेच्या मुख्य कार्यालयावरसुद्धा गुलाबी छटा उमटली आहे. २२ नोव्हेंबर हा दिवस आमच्यासाठी विशेष असून चाहत्यांनी मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी यावे आणि उत्साह वाढवावा,’’ असे आवाहन करण्यात आले आहे.