बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने घेतलेले चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या बळावर भारताने दणदणीत विजय मिळवला. मयांक अग्रवालने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली होती. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव मात्र अवघ्या २१३ धावांवर आटोपला. भारताने सामन्यात विजय मिळवत २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशतकी मजल मारली.

भारतीय संघ शुक्रवारपासून (२२ नोव्हें) पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. त्यामुळे एकीकडे भारतीय संघ आता गुलाबी चेंडूने सराव करत आहे, तर दुसरीकडे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे मंदिरात पूजा-अर्चा करत आहेत. या साऱ्यांदरम्यान भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मात्र स्वप्नांमध्ये रमलेला आहे. रहाणेने एक फोटो शेअर केला आहे. त्यात रहाणे झोपलेला असून त्याच्यासमोर गुलाबी चेंडू ठेवलेला दिसतो आहे. त्या फोटोला त्याने ‘मी आतापासूनच गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कसोटीची स्वप्न बघू लागलो आहे’, असे कॅप्शन दिले आहे.

यावर भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि विराट यांनी भन्नाट रिप्लायदेखील दिले आहेत.

दरम्यान,

दरम्यान, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बांगलादेशचा संघ केवळ १५० धावांवर गारद झाला. यानंतर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. भारताने आपला पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला.

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून मारा करत बांगलादेशची झुंज मोडून काढली. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मुश्फिकुर रहिमने ६४ धावांची खेळी केली, मात्र त्याची झुंज अपयशीच ठरली.