बांगलादेशच्या भारत दौऱ्यातील अंतिम टप्पा म्हणजेच कसोटी मालिकेतील दिवस-रात्र कसोटी सामना… भारत आणि बांगलादेश या दोनही संघांसाठी हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. भारताच्या धारदार गोलंदाजीमुळे बांगलादेशची दाणादाण उडाली. आता दुसरा कसोटी सामना कोलकाता येथे होणार असून हा सामना दिवस-रात्र पद्धतीचा कसोटी सामना असणार आहे.

भारतीय संघ शुक्रवारपासून (२२ नोव्हें) पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. त्यामुळे एकीकडे भारतीय संघ आता गुलाबी चेंडूने सराव करत आहे, तर दुसरीकडे बांगलादेशचे गोलंदाज गुलाबी चेंडू पाण्यात बुडवून ओल्या चेंडूने दिवस-रात्र कसोटीसाठी सराव करत आहेत. या दरम्यान आता दोनही संघांच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणारी बाब घडली आहे.

दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पहिल्या चारही दिवसाची तिकिटे विकली गेली आहेत. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने मंगळवारी याबाबतची माहिती दिली.  बांगलादेश विरूद्धच्या पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याची पहिल्या चार दिवसांची तिकिटे विकली गेली आहेत. सामना हा जवळपास हाऊसफुल झाला आहे. त्यामुळे मी खूपच आनंदी आहे, असे गांगुलीने सांगितले.

दरम्यान, भारत-बांगलादेश यांच्यात शुक्रवारपासून रंगणाऱ्या प्रकाशझोतातील ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी कोलकाता शहर गुलाबी रंगात न्हाऊन निघाले आहे. कोलकातातील रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत सगळीकडे गुलाबी वातावरण पाहायला मिळत आहे. या सामन्याद्वारे बंगाल क्रिकेट असोसिएशन चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी गमावण्यास इच्छुक नसून संघटनेच्या मुख्य कार्यालयावरसुद्धा गुलाबी छटा उमटली आहे. ‘‘२२ नोव्हेंबर हा दिवस आमच्यासाठी विशेष असून चाहत्यांच्या सुरक्षिततेसाठी कोलकाता पोलीस सज्ज झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी मोठ्या संख्येने हा सामना पाहण्यासाठी येऊन आमचाही उत्साह वाढवावा,’’ असे आवाहन कोलकाता पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांनी केले आहे.