दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या बांगलादेश संघाची दुसऱ्या कसोटी सामन्यातही खराब सुरुवात झाली. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपला. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाने बांगलादेशचा संपूर्ण डाव संपवला. इशांतने ५, उमेशने ३ तर शमीने दोन बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये जलदगती गोलंदाजांनी संपूर्ण संघ बाद करण्याची ही चौथी वेळ ठरली.

पहा कसा बाद झाला बांगलादेशचा संपूर्ण संघ –

दरम्यान, या आधी २०१७-१८ च्या हंगामात भारतीय जलदगती गोलंदाजांनी कोलकात्याच्याच इडन गार्डन्स मैदानावर संपूर्ण संघ गारद केला होता. याच कामगिरीची पुनरावृत्ती भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशविरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा केली. आपला पहिला-वहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. केवळ ३८ धावांत बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतला. बांगलादेशचा तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज शून्यावर माघारी परतला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरचा फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे. याआधी २००५ साली झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात असा प्रसंग घडला होता. यानंतर तब्बल १४ वर्षांनी भारतीय गोलंदाजांनी या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.