भारताने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने घेतलेले चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या बळावर भारताने दणदणीत विजय मिळवला. मयांक अग्रवालने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली होती. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव मात्र अवघ्या २१३ धावांवर आटोपला. या विजयासह भारताने २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

Video : भारतीय गोलंदाजांपुढे बांगलादेशची दाणादाण, पहा कसे बाद झाले १० गडी…

भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, उमेश यादव आणि इशांत शर्मा या तिघांची एक छोटीशी मुलाखत समालोचक हर्षा भोगले यांनी घेतली. त्यात इशांत शर्माने मोहम्मद शमी याला एक असा प्रश्न विचारला मोहम्मद शमी मैदानावरच हसायला लागला. भारतीय संघ शुक्रवारपासून (२२ नोव्हें) पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. त्यामुळे इशांतला गुलाबी चेंडूबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. पण इशांतने तो प्रश्न शमीकडे फिरवला आणि त्यात स्वत:चाही एक प्रश्न वाढवला.

‘Practice makes ‘Hitman’ perfect!’, रोहित शर्माचा हा VIDEO एकदा पहाच

“गुलाबी चेंडूने चांगली कामगिरी कशी करावी ते आपल्याला शमीकडूनच चांगल्या पद्धतीने समजू शकेल. मी असं ऐकलं आहे की शमीने गुलाबी चेंडूने खेळताना ११ षटकात ५ बळी टिपले होते. हे असं एखाद्या गोलंदाजाला कसं काय जमतं बुवा… आम्ही फलंदाजांना चकवून आणि स्विंग कंटाळलो आहोत… पण तुला मात्र बहुतेक चेंडूंवर विकेट मिळतात. त्यामुळे आता तू आम्हाला सांगूनच टाक की तू नक्की करतोस तरी काय?” असा प्रश्न इशांतने विचारला.

हा प्रश्न ऐकून शमीलादेखील हसू अनावर झालं. पण त्याने मोठ्या हुशारीने उत्तर दिले. तुमच्यासारख्या (इशांत आणि उमेश) अनुभवी गोलंदाजांची साथ आणि संघ व्यसस्थापनाने दाखवलेला विश्वास याच भरवशावर मी चांगली कामगिरी करतो, असे उत्तर शमीने दिले.