भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या टी २० सामन्यावर ‘महा’ वादळाचे सावट होते. मात्र त्या वादळाचा कोणताही अडथळा न येता सामना सुरळीत पार पडला. उलट पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघाला या सामन्यात हिटमॅन वादळाचा तडाखा बसला. रोहितच्या ८५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

पहिल्या सामन्यात भारताची डोकेदुखी ठरलेला मुश्फिकूर रहीम या सामन्यात फटकेबाजी करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरला. पहिल्या सामन्यात त्याने चहलच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्याच्या दिशेने फटका मारला. तेव्हा कृणालने झेल सोडल्यानंतर सामना बांगलादेशच्या बाजूने फिरला होता.

सविस्तर वाचा – Video : अन् सामना भारताच्या हातून निसटला…

दुसऱ्या सामन्यातदेखील मुश्फिकूरला चहलने तसाच चेंडू टाकला. त्यावेळी मुश्फिकूरने फटका खेळला, पण यावेळी कृणालने कोणतीही चूक न करता सामना झेल टिपला आणि मुश्फिकूरला तंबूत धाडले. त्याने ६ चेंडूत केवळ ४ धावा केल्या.

दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास (२९), मोहम्मद नईम (३६), सौम्या सरकार (३०) आणि मोहम्मदुल्लाह (३०) यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक २ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. ११८ धावांच्या भागीदारीनंतर शिखर धवन पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. धवनने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा केल्या. रोहितने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. शतकाच्या नजीक पोहोचताना तो ८५ धावांवर माघारी परतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी करत १३ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.