भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी २० सामना राजकोट येथे खेळवण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना भारताने गमावल्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना ‘करो या मरो’सारखा आहे. तर बांगलादेशच्या संघाला आजचा सामना जिंकून भारताविरूद्ध पहिलावहिला टी २० मालिका विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला चुकीचा DRS घ्यायला लावल्यामुळे किपर ऋषभ पंत चर्चेत होता. या सामन्यातही अशा काहीशा कारणाने ऋषभ पंत पुन्हा चर्चेत आला. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर लिटन दास फलंदाजी करताना क्रीजच्या पुढे आला. पंतने पटकन स्टंपिंग केले, पण पंतच्या चुकीमुळे बांगलादेशला जीवनदान मिळाले. पंतने स्टंपच्या पुढे चेंडू पकडला त्यामुळे तो बाद होऊनही त्याला नाबाद घोषित करण्यात आला.

Video : पंतच्या अतिउत्साहाचा भारताला फटका; बांगलादेशला मिळाले जीवनदान

लिटन दासला पंतमुळे जीवनदान मिळाल्यानंतर काही वेळातच तो अखेर धावचीत झाला. चहलच्या गोलंदाजीवर लिटन दासच्या पायाजवळून चेंडू गेला आणि पंतच्या अंगावर आदळला. चेंडू गोलंदाजाच्या दिशेने जात असल्याचे पाहताच लिटन दास चोरटी धाव घेण्यासाठी निघाला, पण थोडासा गोंधळ झाला. तेवढ्यात पंतने धावत जाऊन चेंडू पकडला आणि चेंडू स्टंपवर मारून लिटन दासला धावचीत केले.

क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाजाच्या बॅटला न लागता किपरकडे जात असेल तर किपरने चेंडू स्टंपच्या रेषेच्या मागे पकडणे आवश्यक असते. मात्र त्याने तसे न करता अतिउत्साहाने चेंडू स्टंपच्या रेषेच्या पुढे पकडला आणि बांगलादेशच्या लिटन दासला जीवनदान दिले होते. पण त्याला धावचीत करत पंतने आपला बदला घेतला.