भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या टी २० सामन्यावर ‘महा’ वादळाचे सावट होते. मात्र त्या वादळाचा कोणताही अडथळा न येता सामना सुरळीत पार पडला. उलट पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघाला या सामन्यात हिटमॅन वादळाचा तडाखा बसला. रोहितच्या ८५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

IND vs BAN : एकच वादा रोहितदादा.. लगावला विक्रमांचा चौकार

“मोठे आणि उत्तुंग षटकार लगावण्यासाठी फलंदाजाला सामर्थ्यवान असणे किंवा बलवान स्नायू असणे आवश्यक नाही. तू (चहल) देखील मोठे षटकार लगावू शकतोस. केवळ बलवान असणे षटकार खेचण्यासाठी पुरेसे नाही, तुम्हाला योग्य वेळी तो फटका खेळावा लागतो. चेंडू बॅटच्या मध्यभागी लागणे आवश्यक असते आणि नजर सरळ चेंडूवर असणे गरजेचे असते. या सगळ्या गोष्टी असल्यावर मोठे आणि उत्तुंग षटकार लगावता येतात”, असे रोहितने सांगितले.

युझवेंद्र चहलच्या चहल टीव्हीसाठी सामना संपल्यानंतर रोहितने एक मुलाखत दिली. त्यात त्याने उत्तुंग षटकार लगावण्यासाठी काय आवश्यक आहे आणि मी उत्तुंग षटकार कसे लगावतो, हे त्या मुलाखतीत सांगितले. “मी जेव्हा तीन षटकार मारले, तेव्हा मला त्या षटकात सहाच्या सहा षटकार मारायचे होते. मी तसा प्रयत्नदेखील केला, पण चौथ्या चेंडूवर मला षटकार खेचता आला नाही, त्यामुळे मी माझा विचार बदलला आणि एकेरी-दुहेरी धावा काढण्याचा निर्णय घेतला”, असेही तो म्हणाला.

IND vs BAN : सामना जिंकला, सामनावीर ठरला… तरीही रोहितला ‘या’ गोष्टीची खंत

दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास (२९), मोहम्मद नईम (३६), सौम्या सरकार (३०) आणि मोहम्मदुल्लाह (३०) यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक २ बळी टिपले.

Video : तिसऱ्या पंचांची चूक अन् रोहितच्या तोंडून निघाली शिवी…

या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. ११८ धावांच्या भागीदारीनंतर शिखर धवन पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. धवनने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा केल्या. रोहितने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. शतकाच्या नजीक पोहोचताना तो ८५ धावांवर माघारी परतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी करत १३ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.