भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या टी २० सामन्यावर ‘महा’ वादळाचे सावट होते. मात्र त्या वादळाचा कोणताही अडथळा न येता सामना सुरळीत पार पडला. उलट पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघाला या सामन्यात हिटमॅन वादळाचा तडाखा बसला. रोहितच्या ८५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

वाचा सविस्तर – IND vs BAN : एकच वादा रोहितदादा.. लगावला विक्रमांचा चौकार

“वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल या दोघांना गोलंदाजीची चांगली समज आहे. सामन्याचं पारडं कुठल्या दिशेने झुकतंय हे पाहून ते दोघे गोलंदाजी करतात. त्यांच्या गोलंदाजीत सुधारणा जाणवते आहे. चहलने सामन्यात उत्तम गोलंदाजी केली आणि भारताला सामन्यात वरचढ ठरण्यात मदत केली. त्याचाही त्यामुळे आत्मविश्वास दुणावला. सुंदरला आम्ही नव्या चेंडूने गोलंदाजी करायला देतो, पण आज आम्हाला त्याची षटके राखून ठेवायची होती. पण आम्ही फिल्डिंगमध्ये सुमार कामगिरी केली या एका गोष्टीची मला खंत आहे. आणि ती चूक आम्हाला मान्य आहे”, असे रोहित म्हणाला.

Video : याला म्हणतात ‘बदला’… आधी संधी गमावली पण नंतर केला ‘हिसाब बराबर’

दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास (२९), मोहम्मद नईम (३६), सौम्या सरकार (३०) आणि मोहम्मदुल्लाह (३०) यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक २ बळी टिपले.

पहा Video – रोहितचा ‘रूद्रावतार’! ३ चेंडूत लगावले ३ षटकार

या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. ११८ धावांच्या भागीदारीनंतर शिखर धवन पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. धवनने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा केल्या. रोहितने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. शतकाच्या नजीक पोहोचताना तो ८५ धावांवर माघारी परतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी करत १३ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.