भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्या सत्रात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याचे काही अंशी दिसून आले. सामन्यात भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने एक महत्त्वाचा पराक्रम केला.

आजचा कसोटी सामना हा रोहितचा ३५० वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे. रोहित बांगलादेश विरूद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३१ वा कसोटी सामना खेळत आहे. या आधी रोहितने टीम इंडियासाठी २१८ एकदिवसीय आणि १०१ टी २० सामने खेळले आहेत. अशाप्रकारे रोहितने ३५० चा टप्पा गाठला आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्यांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगात अव्वल आहे. त्याने ६६४ सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि १ टी २० सामन्यांचा समावेश आहे. रोहित या यादीत खूप मागे आहे.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे उपहारापर्यंत बांगलादेशने ३ बाद ६३ अशी मजल मारली. शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांनी उपहारापर्यंत १-१ बळी टिपला.

सामन्यासाठी दोनही संघ पुढीलप्रमाणे –

भारत – मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा

बांगलादेश – इम्रुल काइस, शाद्मन इस्लाम, मोहम्मद मिथुन, मोमिनुल हक (कर्णधार), मुश्फिकुर रहीम, महमुदुल्ला, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन, तैझुल इस्लाम, अबू जैद, एबादत हुसेन