बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताने १ बाद ८६ धावा केल्या. बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्या डावात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचा पहिला डाव केवळ १५० धावांत आटोपला. त्यानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. पण चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल या दोघांनी दमदार खेळी केली.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल म्हणाला की फलंदाजांना चेंडू खेळताही येणार नाही इतकी खेळपट्टी वाईट नव्हती. खेळपट्टी खराब असती मी आणि मुश्फिकूर चांगला खेळपट्टीवर टिकूच शकलो नसतो. मूळ समस्या अशी होती की जेव्हा आपण जगातील पहिल्या क्रमांकाच्या संघाविरोधात खेळत असतो, तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या खूप सामर्थ्यवान असणे महत्त्वाचे असते.

हे वाचा – IND vs BAN : टीम इंडियाचा ‘हिटमॅन’… नाबाद ३५०!

बांगलादेशने संघात पाचवा गोलंदाज न खेळवण्याबाबतही त्याने भाष्य केले. “पारंपरिक पद्धतीने संघाची बांधणी करताना बांगलादेशच्या संघात कायम फलंदाजांचा अधिक भरणा असतो आणि चार गोलंदाज असतात. त्यात दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा समावेश असतो. आमच्या संघातील अबु आणि एबादत हे दोन वेगवान गोलंदाज गेले काही दिवस चार-दिवसीय सामने खेळत आहेत आणि चांगली कामगिरी करत आहेत. बाकीचे फारसे क्रिकेट खेळलेले नाहीत. त्यामुळे हा सामना मानसिकदृष्ट्या खेळणं महत्त्वाचं ठरत आहे”, असे मोमिनुल म्हणाला.

त्याआधी, शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.