भारत आणि बांगलादेश यांच्यातील नागपूरमधील तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोहम्मदुल्लाह याने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. श्रेयस अय्यर (६२) आणि के एल राहुल (५२) यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने २० षटकात ५ बाद १७४ धावा केल्या आणि बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजीच्या वेळी भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने एक अतिसुंदर झेल टिपला.

२ चौकार लगावत बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास याने दमदार सुरूवात केली. फटकेबाजी सुरू ठेवत त्याने एक मोठा फटका खेळला, पण तो चेंडू अपेक्षेइतका दूर गेला नाही. सीमारेषेवर तैनात असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने तो झेल अत्यंत भन्नाट प्रकारे पकडला. झेल पकडताना त्याचे दोन्ही पाय जमिनीवर घसपटले. पण त्याने आपला तोल जाऊ दिला नाही अन् झकास झेल टिपला.

हा पहा व्हिडीओ –

त्या आधी, कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्याने ६ चेंडूत २ धावा केल्या.
रोहितनंतर शिखर धवनही लवकर माघारी परतला आणि भारताला दुसरा धक्का बसला. त्याने ४ चौकारांसह १६ चेंडूत १९ धावा केल्या. बराच काळ फॉर्मशी झगडत असलेला लोकेश राहुल याला अखेर सूर गवसला. ३३ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने त्याने अर्धशतक झळकावले. दमदार अर्धशतक ठोकल्यानंतर लोकेश राहुल लगेचच माघारी परतला. त्याने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या.

युवा खेळाडू श्रेयस अय्यर याने धडाकेबाज खेळी करत २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. आपले पहिलेवहिले टी २० शतक झळकावणारा श्रेयस अय्यर ३३ चेंडूत ६२ धावा करून झेलबाद झाला. त्याने ३ चौकार आणि ५ षटकार लगावले. श्रेयस अय्यर (६२) आणि के एल राहुल (५२) यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने २० षटकात ५ बाद १७४ धावा केल्या. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले.