भारताविरूद्ध चेन्नईला सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने धडाकेबाज द्विशतक ठोकले. रूटच्या या खेळीमुळे इंग्लंडच्या संघाने चहापानापर्यंत ४ बाद ४५४ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवशी डॉम सिबली आणि दुसऱ्या दिवशी अष्टपैलू बेन स्टोक्सच्या यांच्या साथीने जो रूटने संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले.

रूट-स्टोक्स जोडीने पहिलं सत्र दमदारपणे खेळून काढलं. दुसऱ्या सत्रात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बेन स्टोक्स झेलबाद झाला. स्टोक्सने ११८ चेंडूत ८२ धावा केल्या. त्याच्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर रूटने ओली पोपच्या साथीने डाव पुढे नेला आणि द्विशतक पूर्ण केलं. रूटने ३००हून अधिक चेंडू खेळून द्विशतक पूर्ण केलं.

त्याआधी, ५ फेब्रुवारीला जवळपास वर्षभराने भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला शुक्रवारी सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरूवात केली. काही वेळाने अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करताना रॉरी बर्न्स झेलबाद झाला. त्याने ६० चेंडूत ३३ धावा केल्या. त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्स शून्यावर बाद झाला. पाचव्या चेंडूवर त्याला बुमराहने पायचीत केले. नंतर रूट-सिबलीने २०० धावांची भागीदारी केली. सिबली ८७ धावांवर पायचीत झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.