अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना सुरू आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची निराशाजनक सुरूवात झाली. शुभमन गिलनंतर मैदानावर आलेला पुजार बाद झाला, त्यानंतर कर्णधार कोहलीनेही चाहत्यांची निराशा केली. सामन्याच्या पहिल्या डावात कोहली शून्यावरच बाद झाला. आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत कोहली १२व्यांदा शून्यावर बाद झाला असून, त्याने धोनीच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी केली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा मैदानावर आले. मात्र, पुजारा फार मैदानावर थांबला नाही. पुजारा बाद झाल्यानंतर कोहली खेळायला आला. मात्र, त्याला चांगला खेळ करता आला नाही. विराटला बेन स्टोक्सने विराटला बाद केलं. विराट भोपळाही न फोडता मैदानावरून परतला. कसोटी कारकीर्दीत विराट कोहली १२व्यांदा बाद झाला आहे.

त्याचबरोबर विराटच्या नावे नकोशा विक्रमाचीही नोंद झाली आहे. कर्णधार म्हणून विराट शून्यावर बाद होण्याची ही ८ वी वेळ होती. विराटने धोनीच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. धोनीही कसोटीमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना ८ वेळा शून्यावर बाद झालेला आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. याआधी २०१४ मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना विराटच्या नावे अशाच निराशाजनक कामगिरी नोंद झाली होती. इंग्लंड विरुद्ध २०१४ मध्ये खेळण्यात आलेल्या कसोटी मालिकेतही विराट दोनदा शून्यावर बाद झाला होता. त्या मालिकेत लियाम प्लंकेट आणि जेम्स अँडरसननं त्याला आऊट केलं होतं. तर यावेळेस मोईन अली आणि बेन स्टोक्सनं विराटला आपल्या जाळ्यात अडकवलं.