Ind vs Eng : इंग्लंड-भारत कसोटी मालिकेत इंग्लंडने पाचव्या कसोटीत पहिल्या डावात सर्वबाद ३३२ धावा केल्या. इंग्लंडचा तडाखेबाज खेळाडू जोस बटलर याच्या ८९ धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडला या डावात त्रिशतकी मजल मारता आली. बटलर-ब्रॉड जोडीने इंग्लंडच्या डावाला आकार दिला. मात्र केवळ सहा धावांच्या फरकाने या जोडीचा एक विक्रम हुकला.
७ बाद १९८ या धावसंख्येवरून इंग्लंडने डावाला आज सुरुवात केली. पहिल्या सत्रात भारताला इंग्लंडचा केवळ १ गडी बाद करता आला. तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करून इंग्लंडचा डाव लवकर संपवण्याचा भारतीय गोलंदाजांचा मानस होता. पण त्यांच्या या मनसुब्यांवर बटलर-ब्रॉड जोडीने पाणी फेरले. जोस बटलरने खेळपट्टीवर पाय रोवून अर्धशतक ठोकले. तर ब्रॉडनेदेखील त्याला चांगली साथ दिली. त्यामुळेच इंग्लंडने उपहारापर्यंत त्रिशतकी मजल मारली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील नवव्या विकेटसाठी ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली. या आधी कॅमेरून व्हाईट आणि मॅथ्यू होगार्ड यांनी नवव्या विकेटसाठी २००२ साली सर्वाधिक १०३ धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे बटलर-ब्रॉड जोडीचा विक्रम ६ धावांनी हुकला.
दरम्यान, आदिल रशीदच्या (१५) रूपाने बुमराहने भारताला पहिल्या सत्रात एकमेव यश मिळवून दिले. तर दुसऱ्या सत्रात रवींद्र जडेजाने या सत्रात आधी ब्रॉड तर नंतर बटलरला बाद केले. भारताकडून जडेजाने ४, तर इशांत शर्मा आणि बुमराहने ३-३ बळी टिपले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2018 11:46 pm