भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा सतत नवनवे विक्रम करत असतो. सध्या सुरु असलेल्या इंग्लंडच्या दौऱ्यातही त्याने एक विक्रम केला. मालिकेतील पहिल्याच टी२० सामन्यात धोनीने दोन यष्टिचित करत टी२० क्रिकेटमधील सर्वाधिक यष्टिचित करण्याचा विक्रम केला. पाकिस्तानच्या यष्टिरक्षकाचा विक्रम त्याने मोडीत काढला.

आज या टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यात धोनी कशी फलंदाजी करतो किंवा किती यष्टिचित करतो, हे पाहणे तर महत्वाचे असेलच. पण आजच्या सामन्यासाठी केवळ मैदानात पाय ठेवल्यामुळेच धोनी एक विक्रम करणार आहे. धोनी आज आपल्या कारकिर्दीतील ५००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. ही कामगिरी करणारा धोनी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ‘द वॉल’ राहुल द्रविड यांनी याआधी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. यात २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि १ टी२० सामान्यांचा समावेश आहे. तर द्रविडने ५०९ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यात १६४ कसोटी, ३४४ एकदिवसीय आणि १ टी२० सामान्यांचा समावेश आहे. धोनी आतपर्यंत ४९९ सामने खेळला आहे. यात ९० कसोटी, ३१८ एकदिवसीय आणि ९१ टी२० सामने खेळले आहेत. धोनीने २०१४ साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.