भारतीय संघ जवळपास वर्षभराने घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. इंग्लंडचा संघ ५ फेब्रुवारीपासून भारताविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार असून त्यातील पहिले दोन सामने चेन्नईला तर दुसरे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर मात दिल्यामुळे या मालिकेत भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर श्रीलंकेला त्यांच्या धर्तीवर पराभूत केल्याने इंग्लंडचा संघदेखील सकारात्मक ऊर्जेने मैदानात उतरेल. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉईड यांनी या मालिकेच्या निकालाबाबत भविष्यवाणी केली आहे.

Video: पोलार्ड पॉवर… १८ चेंडूत ठोकल्या धडाकेबाज ४७ धावा

“भारतीय संघ आगामी मालिकेत साऱ्यांचाच फेव्हरिट संघ आहे. चाहते इंग्लंडच्या संघाकडून भारतात फारशा अपेक्षा करताना दिसत नाहीयेत. इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका निर्विवाद जिंकली आहे. भारत आणि श्रीलंका येथील खेळपट्ट्या सारख्याच असल्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. पण असं असलं तरी मला जर कोणी पैज लावायला सांगितलं तर मी भारताला पसंती देईन. ऑस्ट्रेलियात आपल्या नेहमीच्या कर्णधाराशिवाय त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवून दाखवला. त्यामुळे भारत हा सध्या जगातील सर्वोत्तम संघ आहे. कारण त्यांच्याकडे अतिशय समतोल संघ आहे”, असं डेलीमेलमधील स्तंभात त्यांनी नमूद केले आहे.

IND vs ENG: ना विराट, ना रोहित, ना रहाणे; ‘या’ खेळाडूची सर्वाधिक चर्चा!

“इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन म्हणाल्याप्रमाणे संघाला जाडेजाची उणीव भासेल. पण अक्सर पटेलसाठी ही खूप चांगली संधी ठरू शकते. इंग्लंड आणि भारत दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत. या दोन्ही संघांमध्ये तगडी स्पर्धा होईल अशी मला आशा आहे. पण तरीदेखील भारतीय संघाची सध्याची लय पाहता ते ही मालिका ३-० किंवा ४-० अशी जिंकतील”, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्याचसोबत, “माझा हा अंदाज चुकला तर मला आनंदच होईल”, असंही ते म्हणाले.