इंग्लंड संघानं दिलेल्या ५७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघानं ६ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ अद्या ३२१ धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंगटन सुंदर (३३) आणि आर. अश्विन (८) नाबाद होते. दिग्गज फलंदाज झटपट माघारी परल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी भागीदारीमुळे भारतीय संघानं २०० धावांचा पल्ला पार केला आहे.

ऋषभ पंतनं झटपट फलंदाजी करत धावसंख्या वाढवली मात्र अवघ्या ९ धावांनी त्याचं शतक हुकलं. पंत चौथ्यांदा नर्वस ९० चा शिकार झाला आहे. भारतीय संघ अडचणीत सापडला तेव्हा अनुभवी चेतेश्वर पुजारानं एका बाजूने सावध खेळ करत डाव सांभाळला होता. तर एका बाजूने पंतची आक्रमक खेळी सुरु होती. मात्र अखेर ही भागीदारी तोडण्यात फिरकीपटू बेसला यश आलं. त्याने ५१ व्या षटकात पुजाराला त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

पुजारा रॉरी बर्न्सच्या हातून झेल बाद होऊन माघारी परतलाय पुजारानं १४३ चेंडूत ११ चौकारांसह ७३ धावा केल्या. पंत आणि पुजारानं ११९ धावांची भागीदारी केली. पुजारा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर पंतला साथ देण्यासाठी मैदानावर आला आहे. त्यानंतर पंतने षटकार खेचत भारताला २०० धावाही पार करुन दिल्या. मात्र, त्यानंतर नव्वदीच्या घरात पोहचल्यानंतर पंत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. त्याला बेसनेच बाद केले. पंतनं ८८ चेंडूत ९१ धावा चोपल्या. या खेळीत पंतने ९ चौकार आणि ५ षटकार मारले.

५७८ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचा ७४ धावात चार गडी तंबूत परतले होते. अशा परिस्थितीत पंत-पुजारा जोडीनं भारतीय संघाचा डाव सावरला. विराट कोहली (११), अजिंक्य राहणे (१) आणि रोहित शर्मा (६) यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आलं. युवा शुबमन गिल यानं २९ धावांची छोटेखानी खेळी केली. इंग्लंडकडून  फिरकीपटू डॉम बेस यानं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर जोफ्रा आर्चरनं दोन बळी मिळवले.

कर्णधार-उपकर्णधार अपयशी –
कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना आपल्या लौकिसास साजेशी खेळी करण्यात अपयश आलं. दोघेही फिरकीच्या जाळ्यात अडकले. भारताच्या २५ व्या षटकात बेसने ऑली पोपकरवी विराटला बाद केलं. विराट बाद झाल्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी मैदानावर आला आहे. पण तो फार काही खास करु शकला नाही. रहाणेला ६ चेंडूत १ धावांवर खेळत असताना बेसनेच झेलबाद केले.

इंग्लंडचा ५७८ धावांचा डोंगर
इंग्लंड संघानं पहिल्या डावांत १९०.१ षटकांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला. जो रुटने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत द्विशतकी खेळी केली आहे. रुटनं ३७७ चेंडूत सर्वाधिक २१८ धावा केल्या. या खेळीत त्याने १९ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने ८२ आणि डॉम सिब्लीने ८७ धावांची खेळी केली. भारताकडून बुमराह आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३-३ बळी मिळवले आहेत. तर इशांत आणि नदीम यांनी दोन-दोन बळी घेतले.