दुसऱ्या टी २० सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाला ५ गडी आणि ५ चेंडू राखून पराभूत केले. ११२ धावांचे दिलेले माफक आव्हान इंग्लंडने केवळ ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयाबरोबरच ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत इंग्लंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली.

भारताने प्रथम फलंदाजी करत ८ बाद १११ धावा केल्या होत्या. भरवशाची खेळाडू आणि कर्णधार स्मृती मंधानाने या सामन्यात निराशा केली. ती केवळ १२ धावांवर बाद झाली. अनुभवी मिताली राजने सर्वाधिक २० धावा केल्या. यांच्याव्यतिरक्त दीप्ती शर्मा (१८), भारती फुलमाळी (१८) आणि हरलीन देओल (१४) यांनी दोन अंकी धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र एक अंकी धावसंख्येवर समाधान मानावे लागले. इंग्लंडकडून कॅथरीन ब्रन्ट हिने १७ धावांत सर्वाधिक ३ बळी टिपले.

११२ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर बिमॉण्ट (८), अमी जोन्स (५), स्कायव्हर (१) आणि नाईट (२) हे पहिले ४ फलंदाज झटपट बाद झाले. पण इंग्लंडची सलामीवीर डॅनियल व्हॅट हिने शानदार अर्धशतकी खेळी केली. तिने ५५ चेंडूत नाबाद ६४ धावा ठोकल्या. यात ६ चौकारांचा समावेश होता. तिला विनफिल्डने चांगली साथ दिली. विनफिल्डने २३ चेंडूत २९ धावा केल्या.

या पराभवामुळे भारतीय महिलांनी एकदिवसीय मालिकेपाठोपाठ टी २० मालिकाही गमावली. या मालिकेतील तिसरा सामना शनिवारी होणार आहे.