भारतीय संघाने गुरुवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्माने नाबाद १३७ धावा केल्या आणि भारताला सामना जिंकवून दिला. सलामीवीर रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहलीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनेही शानदार ७५ धावा केल्या आणि रोहितला छान साथ दिली. या दोघांनी १६७ धावांची भागीदारी केली. इंग्लंडने दिलेल्या २६९ या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहितने विराटच्या साथीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली आणि गोलंदाजीवर हल्लाबोल करत चौफेर फटकेबाजी केली. आदिल रशिदने विराटचा काटा काढला. पण रोहित शर्माने लोकेश राहुलच्या साथीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडकडून आदिल रशिद आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

या सामन्यात युझवेन्द्र चहल हा एका षटकात गोलंदाजी करत असताना फलंदाजाने मारलेला फटका हार्दिक पांड्याने अडवला आणि सीमारेषेवरून चेंडू गोलंदाजाच्या दिशेने फेकला. मात्र चहलचे या फेकलेल्या चेंडूकडे नीटसे लक्ष नसल्याने आणि अपेक्षेपेक्षा चेंडू कमी उडल्याने तो चेंडू चहलच्या गुडघ्यावर आदळला. त्यामुळे चहल कळवळला आणि वेदना सहन न झाल्याने तो मैदानातच गडबडा लोळला. त्यानंतर काही वेळात तो पुन्हा गोलंदाजीची सज्ज झाला होता.

त्याचा मैदानावर लोळतानाचा फोटो पोस्ट करत ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने त्याची खिल्ली उडवली. चहल हा ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार याच्यासारखा मैदानावर लोळत आहे, अशा आशयाचा फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आणि त्यात चहललाही टॅग केले.

ब्राझीलचा नेमार हा यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत अनेकदा कारणामुळे किंवा विनाकारण मैदानावर पडून आणि लोळून वेळ घालवत असताना आढळला होता. त्याच्या या कारणामुळे त्याने एकूण १४ मिनिटांचा खेळ वाया घालवला होता.