भारताविरोधात आज होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण करण्यासाठी इंग्लंडचा युवा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन भलताच उत्सुक आहे. दुखापतीमुळे इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन मालिकेबाहेर गेला आहे, त्याच्या जागी लियाम लिव्हिंगस्टोन खेळेल, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली. त्यानंतर या संधीसाठी पूर्णपणे तयार असल्याचं लिव्हिंगस्टोनने म्हटलंय.

दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेलेल्या कर्णधार मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलरकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर मॉर्गनच्या जागी लिव्हिंगस्टोन पदार्पण करणार आहे. “मी संघासोबत बराच वेळ घालवला आहे, त्यामुळे आता पदार्पणाबाबत खूपच उत्सुक आहे. ते ( टीम इंडिया ) टी-२० मालिकेसोबत वनडे मालिकेत शानदार क्रिकेट खेळलेत. त्यामुळे जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या संघासमोर स्वत:ची चाचणी घेण्याची ही खूप मोठी संधी आहे”, असं लिव्हिंगस्टोनने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय.

उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज असलेल्या लिव्हिंगस्टोनने याआधी इंग्लंडसाठी दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. शिवाय भारताविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघातही त्याचा समावेश होता, पण त्याला संधी मिळाली नाही. दरम्यान, फलंदाज सॅम बिलिंग्स देखील दुसऱ्या सामन्यासाठी अनुपलब्ध असणार आहे. पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान सीमारेषेवर एक चौकार अडवताना बिलिंग्स जायबंदी झाला होता. त्याच्या गळ्याच्या हाडाला दुखापत झाली. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्याची आशा आहे.