28 February 2021

News Flash

IND vs ENG : सामना रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी अद्याप ३८१ धावांची गरज

विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीवर भारतीय संघाच्या विजयाची मदार

इंग्लंड संघानं दिलेल्या ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. चौथ्या दिवसाखेर भारतीय संघानं एका गड्याच्या मोबदल्यात ३९ धावांपर्यंत मजल मारली आहे. तिसऱ्या सत्रात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला आहे. रोहित शर्माला फिरकीपटू लीचनं त्रिफाळाचीत बाद केलं. रोहित शर्मा अवघ्या १२ धावांवर बाद झाला. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाला विजयासाठी अद्याप ३८१ धावांची गरज आहे. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला ९० षटकांमध्ये ३८१ धावा करायच्या आहेत. तर इंग्लंड संघाला ऐतिहासिक विजयासाठी ९ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल १५ आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद होते. चौथ्या दिवशी भारतीय संघ सामना विजयाच्या दिशेनं पावलं उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे.

२०२१ वर्षाच्या सुरुवातीला गाबा कसोटी सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला होता. तर २००८ मध्ये चेन्नई येथे इंग्लंड विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरच्या शतकी खेळीच्या बळावर ३८७ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजाकडे लक्ष असणार आहे.

चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या बळावर भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावांत भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत इंग्लंड संघाला १७८ धावांवर रोखलं. दोन्ही डावांत इंग्लंड संघाकडे ४१९ धावांची आघाडी आहे. भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांची आवशकता आहे. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक ६ बळी घेतले. नदीमला दोन तर बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

चौथ्या दिवशी भारतीय संघाला ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघानं २४१ धावांची आघाडी घेतली. इंग्लंड संघानं पहिल्या डावांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीवर भारतीय संघाच्या विजयाची मदार आहे. दिग्गज फलंदाजाच्या साथीला शुबमन गिल, पंत आणि सुंदर यासारखे नवखे फलंदाजही आहेत.

अश्वीनने पहिल्याच चेंडूवर मोडला अनेक दशकांपूर्वीचा विक्रम
हिल्या डावात २४१ धावांनी भारतीय संघा पिछाडीवर असताना इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विन यानं इंग्लंडला धक्का दिला. अश्विन यानं पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स याला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केलं. दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बळी घेत ११४ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला.कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मागील ११४ वर्षांत डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकाही फिरकी गोलंदाजाला बळी घेता आला नव्हता. पण चेन्नई कसोटी अश्विन यानं पहिल्या चेंडूवर बळी घेत विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी १८८८मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९०७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल ११४ वर्षानंतर अश्विननं हा मान पटकावला.

इशांतची ऐतिहासिक कामगिरी, ३०० बळींचा टप्पा केला पार
दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना इशांत शर्मानं लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इशांतच्या नावावर ९७ कसोटी सामन्यात २९७ बळींची नोंद होती. चेन्नई कसोटी सामन्यातील पिहल्या डावात इशांत शर्मानं दोन बळी घेतले. तर दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवत ३०० बळींचा पल्ला पार केला आहे. इशांत शर्मानं ९८ व्या कसोटी सामन्यात ३०० बळी घेतेले आहेत. इशांत शर्माआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले आहेत. ३०० पेक्षा जास्त विकेट घेणारा इशांत शर्मा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 5:12 pm

Web Title: ind vs eng india need 381 more to win england need nine wickets nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 IND vs ENG : भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचं आव्हान
2 टीम इंडियाच्या अडचणीत वाढ; इंग्लंडकडून मोठं आव्हान मिळण्याची चिन्हे
3 ऋषभ पंतला ICCकडून मानाचा पुरस्कार जाहीर
Just Now!
X