News Flash

Ind vs Eng : भारताविरुद्धच्या तिसऱ्या T-20 साठी असा आहे इंग्लंडचा मास्टर प्लॅन

मालिका सध्या एक-एक अशी बरोबरीत

(फोटो सौजन्य: twitter/ICC)

पहिल्या सामन्यामध्ये बिचकत बिचकत खेळणाऱ्या भारतीय संघाचा पराभव झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडचीही काहीशी अशीच परिस्थिती झाली आणि सामना भारताने जिंकला. त्यामुळेच आता तिसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडचा संघ अधिक आक्रमक खेळ करणार असल्याची माहिती इंग्लंडचा सालामीवीर असणाऱ्या जेसन रॉयने म्हटलं आहे. एका ऑनलाइन संवादादरम्यान त्याने तिसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडचा संघ कोणत्या पद्धतीचा अवलंब करणार आहे यासंदर्भात भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे त्याने इशान किशनचंही कौतुक केलं आहे.

भारतीय संघाने पहिला सामना अगदी मोठ्या फरकाने गमावल्यानंतर पुढील सामन्यांमध्ये रोकठोक खेळ करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला आणि त्याचा सकारात्मक परिणाम विजयाच्या रुपाने दिसून आला. इंग्लंडचा संघही अशाच पद्धतीने मागील काही काळापासून क्रिकेट खेळत आहे. याचसंदर्भात बोलताना रॉयने, “न घाबरता खेळण्याचा आम्हाला ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये फायदा झाल्याचं दिसून आलं. याचा आम्हाला छोट्या फॉरमॅटमधील क्रिकेटमध्येही फायदा झालाय. त्यामुळे आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या विचारानेच आम्ही तिसऱ्या सामन्यामध्ये मैदानावर उतरणार आहे. मात्र इथे खेळताना मुख्य अडचण ही आहे की अशा खेळपट्ट्यांवर थोडं सावधपणे खेळावं लागतं. त्यामुळे खेळपट्टी पाहून संघाला कसा खेळ करायचा आहे याचा तातडीने निर्णय घ्यावा लागतो,” असं मत व्यक्त केलं.

“जर तुम्ही खेळपट्टी पाहून सुद्धा आक्रम खेळण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही अनेकदा अपयशीही ठरु शकता. पॉवर प्लेमध्येच तीन ते चार विकेट्स पडू शकता. मात्र आमच्या संघामध्ये अगदी तळापर्यंत फलंदाजी करणारे खेळाडू आहेत त्यामुळे सलामीचे फलंदाज आक्रमक खेळ करु शकतात,” असं मत रॉयने व्यक्त केलं. एका प्रकारे रॉयने इंग्लंड कशापद्धतीने मालिकेमधील तिसरा सामना जिंकण्यासाठी धोका पत्करण्यासही तयार असल्याचे संकेतच या वक्तव्यामधून दिलेत. म्हणजे प्रथम फलंदाजी केल्यास जास्तीत जास्त धावा करण्याचं आणि प्रथम गोलंदाजी केल्यास धावा गेल्या तरी जास्ती जास्ती विकेट्स मिळवण्याचा इंग्लंड संघाचा प्रयत्न असेल.

नक्की पाहा फोटो >> खेळी एक विक्रम अनेक… विराटने ७३ धावांच्या खेळीत मोडले ‘हे’ तीन विश्वविक्रम

रॉयने पहिल्या टी-२० सामन्यामध्ये ४९ तर दुसऱ्या सामन्यात ४६ धावा केल्या आहेत. चांगली सुरुवात केल्यानंतरही रॉयला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. “अहमदाबादमधील खेळपट्टी अशी आहे ती जिथे तुम्हाला कोणत्या गोलंदाजाविरोधात धावा करायच्या आहेत हे ठरवावं लागतं. दुर्देव असं आहे की मी ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याचं ठरवलं त्यानेच मला बाद केलं. मी वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर फटके मारण्याचं ठरवलेलं,” असं रॉय म्हणाला.

इशानच्या खेळीवर झाला फिदा…

रॉयने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये इशान किशनची तुफान फलंदाजी पाहिली आहे. त्यामुळेच रविवारी झालेल्या सामन्यामध्ये इशानने केलेली फटकेबाजीर पाहून त्याला फारसं आश्चर्य वाटलेलं नाही. इशानने ३२ चेंडूत ५६ धावांची तुफान खेळी करत आपल्या पहिल्यात आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. इशानच्या याच खेळीवर रॉय फिदा झालाय.

रॉयने, “इशान किशन हा उत्तम खेळाडू आहे हे जगजाहीर आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी अनेकदा अशापद्धतीचा खेळ केला आहे. त्यामुळे त्याने केलेली करियरची धमकेदार सुरुवात पाहून मला फारसं आश्चर्य वाटलेलं नाही,” असं मत नोंदवलं आहे. “एकदा दोनदा त्याला मनासारखे फटके मारता आले नाहीत. मात्र नंतर त्याने षटकार लगावत या फटक्यांची कसर भरुन काढली. आपल्यातील कौशल्य उत्तम पद्धतीने मैदानावर वापरणाऱ्या खेळाडूंपैकी इशान एक आहे,” असंही रॉय पुढे बोलताना म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 3:13 pm

Web Title: ind vs eng jason roy says england team will play more aggressive cricket in third t 20 scsg 91
Next Stories
1 Ind vs Eng : …अन् बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी इशान किशनच्या वडिलांना केला फोन
2 ’16 मार्च’ ही तारीख क्रिकेटच्या देवासाठी आहे खास…वाचा कारण
3 Road Safety World Series: ‘दक्षिण आफ्रिका लीजण्डस’च्या फलंदाजांनी मोडला सचिन-सेहवागचा विक्रम
Just Now!
X