सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने बुधवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला. टी२० सामन्यातील आपला फॉर्म कायम राखत रोहितने या सामन्यातही शतकी खेळी केली. इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत रोहितने नाबाद १३७ धावा केल्या. या दौऱ्यात हे रोहितचे दुसरे शतक ठरले. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

या सामन्यात भारताचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव याने इंग्लंडच्या फलंदाजांना चारी मुंड्या चित केले. कुलदीपने १० षटकांत केवळ २५ धावा देत तब्बल ६ बळी टिपले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलावहिला डावखुरा फिरकीपटू ठरला. या आधी भारताच्या मुरली कार्तिकच्या नावावर हा विक्रम होता. त्याने १० षटकात २७ धावा देत सहा बळी टिपले होते. मात्र कुलदीपने कार्तिकपेक्षा सरस कामगिरी करत इंग्लंडच्या फलंदाजांचे तीन तेरा वाजवले.

दरम्यान, या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनेही शानदार ७५ धावा केल्या आणि रोहितला छान साथ दिली. या दोघांनी १६७ धावांची भागीदारी केली. इंग्लंडने दिलेल्या २६९ या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहितने विराटच्या साथीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली आणि गोलंदाजीवर हल्लाबोल करत चौफेर फटकेबाजी केली. आदिल रशिदने विराटचा काटा काढला. पण रोहित शर्माने लोकेश राहुलच्या साथीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडकडून आदिल रशिद आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.