Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या मालिकेत विराट कोहली भारतीय संघाचे उत्तम प्रकारे नेतृत्व करत आहे. त्याचा परिणाम तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसूनही आला. पण केवळ कर्णधार म्हणूनच नव्हे तर फलंदाज म्हणूनही तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे. सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे, जो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या खेळीच्या जवळ जाऊ शकतो, असे मत इंग्लंडचा गोलंदाजी सल्लागार आणि पाकिस्तानचा माजी फिरकीपटू साकलेन मुश्ताक याने व्यक्त केले आहे. पीटीआयशी एका विशेष मुलाखतीत तो बोलत होता.

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये कोहली फलंदाजांच्या गटाचे कशा पद्धतीने नेतृत्व करतो, त्यावर सामने कसे होतात हे ठरेल. फलंदाज म्हणून सचिन हा एक मोठा आणि प्रतिभावान खेळाडू होता. आपण विविध युगातील दोन फलंदाजांची तुलना करू शकत नाही. पण तरीदेखील क्रिकेटच्या मैदानावर विराट हा सचिनच्या जवळ जाणारा फलंदाज आहे, असेही तो म्हणाला.

विराटच्या तिसऱ्या सामन्यातील खेळीची इंग्लंडच्या स्पोर्ट स्टाफमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. त्या एका कसोटीपुरते पाहायचे झाल्यास अँडरसनचे जवळपास ४० चेंडू ऑफ स्पॅम्पच्या बाहेर गेले आणि विराटला त्या चेंडूवर बॅट लावता आली नाही. पण त्या पुढच्या चेंडूवर तो अप्रतिम फटका मारत होता. कारण तो प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव आणि प्रत्येक सत्र नव्याने खेळत होता. त्यामुळे त्याला चांगली खेळी करता आली. जेव्हा कोणी धावांचा भूकेला असतो, आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी तो फलंदाज काहीही करू शकतो, अशा शब्दात त्याने विराटाचे कौतुक केले.