भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार होता. भारतीय संघाचे कनिष्ठ फिजिओ योगेश परमार कोविड -१९ चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हा सामना न खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला. याबाबत भारतीय क्रिकेटपटूंकडून आतापर्यंत कोणतेही वक्तव्य करण्यात आलं नव्हतं. आता भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने याबाबत मौन सोडलं आहे. चौथ्या कसोटी दरम्यान टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोविड -१९ चाचणीमध्ये सकारात्मक आढळले, त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि वरिष्ठ फिजिओ मँचेस्टर कसोटीसाठी भारतीय संघासोबत जाऊ शकले नाहीत.

द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शार्दुल ठाकूरने याबाबत भाष्य केलं आहे. ‘मी याबद्दल कोणीतरी बोलताना ऐकले होते आणि आम्हाला वाटत होते की सामना होईल. जसे सामना होईल असे प्रत्येकाला वाटत होते, अशा स्थितीत आमचे सर्वांचे लक्ष फक्त सामन्यावर केंद्रित होते. आमच्यासोबत आमचे मुख्य सहाय्यक कर्मचारी नसण्याची ही पहिलीच वेळ होती. दिवसभराचा खेळ संपल्यावर ते आम्हाला फोन करायचे, मी भरत अरुण सरांशी बोललो, त्यांनी मला सांगितले की मी कोणत्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करू शकतो. जर त्यांच्याकडे खेळाबाबत काही गोष्टी असत तर ते आम्हाला खेळानंतर सांगत असत, असे शार्दुलने म्हटले आहे.

शार्दुल म्हणाला की सर्व खेळाडू खूप काळजीत होते.’पुढे काय होईल, कोणाला संसर्ग होईल याची आम्हाला चिंता होती कारण फिजिओ योगेश परमार प्रत्येकावर उपचार करत होते. या संसर्गाचा माग काढणे अशक्य असल्याने पुढे काय होईल हे आम्हाला माहित नव्हते. पुढील चार-पाच दिवस आमच्यासाठी कठीण होते कारण मला भीती होती की मला किंवा आपल्यापैकी कोणालाही हा संसर्ग होऊ शकतो. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाची आणि त्यांच्या आरोग्याबाबत काळजी करत होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ यांनी मिळून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे शार्दुलने म्हटले आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक कसोटी सामना १० सप्टेंबर रोजी खेळला जाणार होता. संघात करोनाचा शिरकाव झाल्याने भारतीय खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता.