इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये भारतीय सलामीवीर गडबडल्याने भारताला फार मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. भारताने निर्धारित २० षटकांमध्ये सात गड्यांच्या मोबदल्यात केवळ १२४ धावांपर्यंत मजल मारली. भारताचे पहिले तीन खेळाडू पाच षटकांच्या आत संघाची धावसंख्या २० वर असतानाच तंबुत परतले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ऋषभ पंत आणि पाचव्या क्रमांकाला फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यर यांनी भारतीय फलंदाजीच्या पहिल्या फळीत झालेली पडझड थांबवत डावाला आकार दिला. मात्र पंतही दहा षटकांच्या आतच बाद झाला. एकीकडे भारतीय खेळाडू तंबूत परतत असतानाच दुसरीकडे पाचव्या षटकापासून २० व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत फलंदाजी करत श्रेयस अय्यरने फलंदाजी करत भारतीय संघाला १२० च्या पलीकडे पोहचवलं. भारतीय संघाने केलेल्या १२४ धावांपैकी अर्ध्याहून अधिक धावा श्रेयसनेच केल्या.

नक्की पाहा >> Video: “हा तर क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम शॉट”; पंतचा षटकार पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार चक्रावला

भारताने ६.२७ च्या धावगतीने १२० चेंडूत १२४ धावा फलकावर झळकावल्या. त्यापैकी ६७ धावा या एकट्या श्रेयस अय्यरच्या होत्या. अय्यरने ४८ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १३९.५८ च्या सरासरीने या धावा केल्या. तर दुसरीकडे भारताच्या इतर आठ फलंदाजांनी ७२ चेंडूत ५५ धावांचे योगदान दिलं. या ५५ धावांपैकी २८ धावा चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून आल्या. श्रेयसने एकट्याने आठ चौकार लगावले तर इतर आठ फलंदाजांनी मिळून चार चौकार लगावले. श्रेयसने एक तर इतर सर्व फलंदाजांनी मिळून दोन षटकार लगावले. श्रेयस वगळता इतर सर्व फलंदाजांनी ७६.३८ च्या धावगतीने धावा केल्या.

नक्की वाचा >> Ind vs Eng: पुन्हा एकदा शून्यच… कर्णधार म्हणून विराटच्या नावावर झाला नकोसा विक्रम

सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये आपल्या खेळीसंदर्भात बोलताना श्रेयसने त्याच्या खेळीचं गुपितही सांगितलं. एकीकडे फलंदाज तंबुत परतत असताना तू मैदानात टिकून राहिला आणि शेवटपर्यंत खेळला. हे कसं जमलं असा प्रश्न श्रेयसला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना “चेंडू योग्य पद्धतीने बॅटवर येत नव्हता. त्यामुळे वाकडे तिकडे फटके मारण्यात काहीच अर्थ नव्हता. अनेक चांगले फलंदाज पटापट बाद झाल्यामुळे मी फलंदाजीला गेलो तेव्हा अगदी क्रिकेटमधील ठराविक निवडक फटके म्हणजेच प्रॉपर क्रिकेटींग शॉट खेळण्याचं ठरवलं. त्याचाच मला फायदा झाला,” असं श्रेयस म्हणाला. १९ व्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर श्रेयस मोठा फटका मारण्याच्या नादात ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलानकरवी झेलबाद झाला.