इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोने कसोटी क्रिकेटमध्ये आपण मनापासून खेळत नसल्याचा दावा फेटाळून लावला आहे. भारताविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जॉनी बेअरस्टोने तडाखेबंद फलंदाजी करत शतक ठोकलं आणि मालिकेत संघाला बरोबरीत आणलं. मात्र कसोटी मालिकेत जॉनी बेअरस्टो चांगली फलंदाजी करु शकला नव्हता. इंग्लंडने भारताविरोधातील कसोटी मालिका ३-१ ने गमावली होती.

भारताविरोधातील अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये जॉनी बेअरस्टो शून्यावर बाद झाला होता. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी जॉनी बेअरस्टो मैदानावर जास्त वेळ थांबवण्यास इच्छुक दिसत नसल्याची टीका केली होती.

धावांच्या पावसात भारताची होरपळ!

सुनील गावसकर यांनी केलेल्या टीकेवर जॉनी बेअरस्टोने प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर जॉनी बेअरस्टोने म्हटलं आहे की, “पहिली गोष्ट म्हणजे मी ते काय म्हणालेत हे मी ऐकलेलं नाही, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यात आणि माझ्यात कोणतंही संभाषण किंवा कोणता पत्रव्यवहार झालं नसताना त्यांनी हे मत कसं काय तयार केलं हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे”.

“ते मला कधीही फोन करु शकतात…त्यांचं स्वागत आहे. मी त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची माझी इच्छा आणि कसोटी खेळताना होणारा आनंद याबद्दल त्यांच्याशी चर्चा करेन. मी सांगितलं त्याप्रमाणे माझा फोन चालू आहे. त्यांना हवं असेल तर फोन किंवा मेसेज करु शकतात,” असं जॉनी बेअरस्टोने म्हटलं आहे.

भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसमोर ३३६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली होती. पण जॉनी बेअरस्टोच्या शतकासह बेन स्टोक्स आणि जेसन रॉयच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने चार फलंदाजांच्या मोबदल्यात ३९ चेंडू राखून दिमाखदार विजय साजरा केला. यासोबत तीन सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड १-१ ने बरोबरीत आहेत. रविवारी अंतिम सामना खेळला जाणार असून यावेळी हा सामना निर्णायक असेल.