पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने विजय मिळवत मालिका खिशात घातली. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सॅम करनने जिद्दीने खेळी करत विजय खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. विशेषतः शादुर्ल ठाकूरने केलेल्या गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही केली. त्यामुळे शार्दुलला ‘मॅन द मॅच’ मिळण्याची शक्यता होती. मात्र, सॅम करनला ‘मॅन ऑफ द मॅच’ मिळाल्याने कर्णधार विराट कोहलीनं आश्चर्य व्यक्त केलं.

इंग्लंडकडून खेळताना सॅम करनने नाबाद ९५ धावांची खेळी केली. त्यामुळे सॅम करनला मॅन ऑफ द मॅच आणि तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत २१९ धावा करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात आला. सामना संपल्यानंतर यावर बोलताना कर्णधार विराट कोहलीनं यावर आश्चर्य व्यक्त केलं.

“शार्दुल ठाकूरला मॅन ऑफ द मॅच आणि भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सीरिजसाठी निवड करण्यात आली नाही, याचं मला आश्चर्य वाटतंय. अनुकूल परिस्थिती नसतानाही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली,” असं कोहली म्हणाला.

“जेव्हा दो सर्वश्रेष्ठ संघांमध्ये क्रिकेट सामना होतो, तेव्हा चित्तथरारक खेळ पाहायला मिळतो. कुणालाही सामना गमवायचा नसतो. सॅम करनने चांगली खेळी केली आणि संघाला शेवटपर्यंत सामन्यात टिकवून ठेवलं. भारतीय गोलंदाजी बळी घेतले, मात्र अनेक खेळाडूंनी झेलही सोडले. जे झेल सोडले गेले, त्यावर मी नाराज आहे. जितके झेल सोडू तितके आपण सामन्यात खाली जातो आणि अनेकवेळा हे सोडलेले झेल महागात पडतात,” असं विराट म्हणाला.