स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंडमधील भारताच्या तीन खेळाडूंच्या दुखापतीनंतर या दोन्ही खेळाडूंना बदली म्हणून इंग्लंडला पाठवले जात आहे. शुबमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर इंग्लंड दौर्‍यावर दुखापतग्रस्त झाले आणि हे तिन्ही खेळाडू आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यानंतर टीम मॅनेजमेंटने काही खेळाडू इंग्लंडला पाठवण्याची मागणी केली होती, जी आता निवड समितीने मान्य केली आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांची निवड इंग्लंड दौर्‍यासाठी निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंच्या नावांवरून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा झाली, त्यानंतर चेतन शर्मा यांच्या निवड समितीने अंतिम निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला तीन खेळाडू पाठवण्याची मागणी केली होती, परंतु आतापर्यंत तिसर्‍या खेळाडूच्या नावाचा समावेश झालेला नाही. मीडिया रिपोर्टमध्ये जयंत यादव याचेही नाव होते, पण अद्याप त्याच्या नावाची पुष्टी झालेली नाही.

ind vs eng suryakumar yadav prithvi shaw set to go to england
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव

 

हेही वाचा – TOKYO 2020 : मीराबाई चानूची पहिली प्रतिक्रिया, ‘‘सुवर्णपदकासाठी प्रयत्न केला पण…”

सूर्यकुमार आणि पृथ्वी दमदार फॉर्मात

सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ सध्या श्रीलंका दौर्‍यावर असून हे दोन्ही खेळाडू कमाल फॉर्ममध्ये आहेत. सूर्यकुमार यादवने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ६२च्या सरासरीने १२४ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १२२.७७ असा होता. सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कारही देण्यात आला.

पृथ्वी शॉनेही तीन सामन्यात ३५च्या सरासरीने १०५ धावा केल्या. पृथ्वी शॉने आक्रमक सुरुवात केली, पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. आता हे दोन्ही खेळाडू इंग्लंडला रवाना होतील. हे दोन खेळाडू श्रीलंकेहून इंग्लंडला जातील, की त्यांना भारतात परतावे लागेल हे अद्याप समजू शकलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला चार ऑगस्टपासून सुरुवात होईल.