News Flash

Ind vs Eng : ‘स्पेशलिस्ट’ गोलंदाज परतला, निर्णायक सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

आजच्या अखेरच्या आणि निर्णायक सामन्याआधी टीम इंडियासाठी खूशखबर

(संग्रहित छायाचित्र )

भारत-इंग्लंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक तसेच चाहत्यांचे मनोरंजन करणारी ठरली असून आज (दि.२०) या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना होणार आहे. पाच सामन्यांची ही मालिका आता २-२ अशा बरोबरीवर असल्याने शनिवारी होणाऱ्या निर्णायक लढतीत यश संपादन करून कोणता संघ मालिकेवरही कब्जा करणार, हे पाहणे रंजक ठरेल. दरम्यान, या महत्त्वाच्या सामन्याआधी विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आली आहे.

टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज आणि अल्पावधीतच ‘यॉर्कर किंग’ अशी ओळख निर्माण करणारा टी नटराजन आता तंदरूस्त झाला आहे. डावखुरा जलदगती गोलंदाज टी नटराजन याने फिटनेस टेस्ट पास केली असून तो पाचव्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. बीसीसीआयकडून याबाबत माहिती देण्यात आली.

“नटराजन योयो टेस्ट आणि 2 किमी धावण्यासह सर्व आवश्यक फिटनेस टेस्टमध्ये पास झाला असून काही दिवसांपूर्वीच तो अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. पण करोनामुळे त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आता त्याचा विलगीकरणाचा कालावधी संपला असून तो पुढच्या सामन्यासाठी आणि एकदिवसीय मालिकेसाठीही उपलब्ध असेल”, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.

अलिकडेच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-२० आणि कसोटी मालिकेत नटराजनने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. पाचव्या टी-२० सामन्यात नटराजनला संधी मिळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण तो सामन्यासाठी उपलब्ध असल्याने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताला वेगवान गोलंदाजीसाठी एक उत्तम पर्याय नक्कीच उपलब्ध झाला आहे. चौथा सामना जिंकल्यामुळे आधीच आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला नटराजनच्या पुनरागमनाने अधिक बळकटी मिळाली आहे.

दरम्यान, नाणेफेकीचे महत्त्व कमी करून दमदार कामगिरीच्या बळावर पिछाडीवर असलेल्या भारताने चौथ्या सामन्यात इंग्लंडवर आठ धावांनी सरशी साधली. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर हे मुंबईकर भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा संघाच्या जिगरबाज वृत्तीचे कौतुक करत युवा खेळाडूंची पाठ थोपटली.

राहुलला आणखी एक संधी :-
गेल्या चार सामन्यांत सलामीवीर के. एल. राहुलने अनुक्रमे १, ०, ०, १४ अशा धावा केल्या आहेत. परंतु शिखर धवन आणि इशान किशन यांच्या तुलनेत राहुललाच संघ व्यवस्थापनाची अधिक पसंती असल्याने तो पाचव्या सामन्यातही रोहित शर्मासह सलामीला खेळण्याची दाट शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या सूर्यकुमारसह, कोहली, श्रेयस, पंत यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.

पाच गोलंदाजांचीच रणनीती :-
अष्टपैलू हार्दिक पंड्या पाचव्या गोलंदाजाची भूमिका योग्यपणे बजावत असल्यामुळे भारत पाचव्या लढतीतसुद्धा पाच गोलंदाजांचीच रणनीती कायम राखण्याची शक्यता आहे.

इंग्लंडला मधल्या फळीकडून अपेक्षा :-
पराभूत झालेल्या दोन्ही सामन्यांत इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. जोस बटलर आणि जेसन रॉय हे दोघेही स्वस्तात माघारी परतल्यावर आठव्या क्रमांकापर्यंत लांबलेली फलंदाजांची फळी अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे कर्णधार इऑन मॉर्गनसह, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो यांना जबाबदारीने खेळण्याची गरज आहे.

इंग्लंड संघाला दंड :-
चौथ्या ट्वेन्टी-२० लढतीत षटकांची गती न राखल्याबद्दल इंग्लंड संघातील खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातील २० टक्के रक्कम कापण्यात आली. निर्धारित वेळेत इंग्लंडने एक षटक कमी टाकले.

संघ :-
* भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.

* इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.

* वेळ : सायंकाळी ७ वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:12 pm

Web Title: ind vs eng t natarajan clears the fitness test will be available for 5th t20 sas 89
टॅग : Ind Vs Eng
Next Stories
1 लक्ष्यचे आव्हान संपुष्टात
2 आज निर्णायक झुंज!
3 सूर्यकुमारच्या जडणघडणीत ‘अशोक त्रिमूर्ती’
Just Now!
X