भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील आज (रविवार) दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात काही बदल करण्यात आले असून, त्यानुसार शिखर धवन आणि अक्षर पटेलला संघामधून वगळण्यात आलेलं आहे. त्यांच्या जागी इशान किशन आणि सूर्यकुमार यांना संधी देण्यात आलेली आहे. या मालिकेत इंग्लंड १-० ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर आठ गड्यांनी विजय मिळवला होता.

दरम्यान,आज इंग्लंडच्या फलंदाजीला सुरूवात झाली तेव्हा, भुनवनेश्वर कुमारने बटलरला भोपळाही न फोडू देता बाद करत  इंग्लंडला पहिला झटका दिला. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर भुवनेश्वरने जोस बटलरला एलबीडब्ल्यू आउट केलं. तेव्हा इंग्लंडचा धावसंख्या अवघी १ होती. त्यानंतर इंग्लंडची धावसंख्या ६४ असताना यजुर्वेंद्र चहलने आठव्या षटकामध्ये डेव्हिड मलानला(२४) एलबीडब्ल्यू बाद करून इंग्लंडला दुसरा धक्का दिला. तर, इंग्लंडची धावसंख्या ९१ असताना वॉशिंग्टन सुंदरने ११ व्या षटकामधील पहिल्या चेंडूवर जेसन रॉयला(४६) बाद केलं. भुवनेश्वर कुमारने रॉयचा झेल घेतल्याने इंग्लंडचा तिसरा गडी बाद झाला. यानंतर इंग्लंडची धावसंख्या ११९ असताना  १३ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने जॉनी बेअरस्टोला(२०) सूर्यकुमार यादवकडे झेल देण्यास भाग पाडले आणि इंग्लंडला चौथा झटका बसला. तर, इंग्लंडची धावसंख्या १४२ असताना १७ व्या षटकात शार्दूल ठाकूरने ईऑन मॉर्गनला(२८) बाद केलं, ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला. यानंतर शार्दूल ठाकूरने टाकलेल्या २० षटकात बेन स्टोक्सचा(२४) हार्दिक पंड्याने झेल घेतला  इंग्लंडचा सहावा गडी एकूण धावसंख्या १६० असताना तंबूत परतला.  यानंतर   सॅम करन व ख्रिस जॉर्डन हे नाबाद राहिले. २० षटकांमध्ये सहा गडी गमावून इंग्लंडची एकूण धावसंख्या १६४ झाली व भारताला १६५ धावाचं लक्ष्य मिळालं.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.

इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.