भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान दुसऱ्या टी -20 सामन्यात भारताने आज सात विकेट्स राखून इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. या विजयाने भारताने पहिल्या सामन्यातील पराभवाचा एकप्रकारे वचपा काढला. कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ धावा करून,  भारताच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारताला १६५ धावांचे लक्ष्य दिले होते.

तर, इंग्लंडने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली होती. आघाडीचा फलंदाज के एल राहुल शुन्यावर बाद झाल्याने, भारतीय संघाला पहिला मोठा झटका बसला. तेव्हा भारतीय संघाने देखील आपलं खातं उघडलं नव्हतं. पहिल्या षटकात भारतला एकही धाव काढता आली नाही. सॅम करन याने के एल राहुलला बाद केलं. जोस बटलरने त्याचा यष्टीमागे झेल टिपला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि इशान किशन यांनी डावाला सावरलं. सहा षटकांत त्यांनी ५० धावांची भागीदारी केली. इशान किशनने स्फोटक फलंदाजी करत २८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर भारतीय संघाची १० षटकात ९४ धावासंख्या असताना इशान किशन ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला. आदिल रशीदने त्याला एलबीडब्ल्यू बाद केलं. यानंतर धावसंख्या १३० असताना १३ व्या षटकात रिषभ पंत १३ चेंडूत २६ धावा काढून झेल बाद झाला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या षटकात जॉनी बेअरस्टोने त्याचा झेल टिपला व भारताचा तिसरा गडी बाद झाला. यानंतर विराट कोहलीने  कर्णधाराला साजेशी नाबाद  ४९ चेंडूत ७३ धावांची खेळी करत भारताला विजयी केलं. श्रेयस अय्यर व विराट कोहली नाबाद राहिले. भारताने १७ षटकं व पाच चेंडूत १६६ धावा केल्या.

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.

इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.