कसोटी मालिकेमध्ये साहेबांच्या संघाला ३-१ ने हरवणाऱ्या टीम इंडियाकडून टी-२० मालिकेमध्ये देखील तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना होती. मात्र, टी-२० मालिकेची सुरुवात भारतासाठी निराशाजनक झाली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये इंग्लंडकडून भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. विजयासाठी १२५ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त दोन विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं. यामध्ये सलामीवीर जेसन रॉयनं केलेल्या ३२ चेंडूत ४९ धावांचा मोठा वाटा होता. या खेळीमध्ये रॉयनं ३ सणसणीत षटकार आणि ४ चौकार लगावले.

जेसन रॉय (४९) आणि जॉस बटलर (२८) या दोघांनी इंग्लंडला ७२ धावांची दणदणीत सलामी दिली आणि टीम इंडियाच्या हातून सामना निसटल्याचं स्पष्ट झालं. आपला १००वा सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलनं आठव्या षटकामध्ये जॉस बटलरला पायचीत करून टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यापाठोपाठ १२व्या षटकामध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला पायचीत करून माघारी धाडलं. मात्र, तोपर्यंत या दोघांनी सामना इंग्लंडच्या खिशात आणून ठेवला होता. सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर आलेल्या डेविड मलान(२४) आणि जॉनी बेयरस्टो(२६) यांनी हातात आलेल्या इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासोबत इंग्लंडने मालिकेत १-० आघाडी घेतली.

Video: “हा तर क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम शॉट”; पंतचा षटकार पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार चक्रावला

त्याआधी टॉस हरल्यामुळे फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर २ धावा असताना भरवशाच्या के. एल. राहुलला जोफ्रा आर्चरनं माघारी धाडलं. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनं देखील पॅव्हेलियनचा रस्ता धरला. भारताचा स्कोअर ३ धावांवर २ विकेट असा झाला होता. शिखर धवनला (४) देखील पाचव्या ओव्हरमध्ये भारताच्या २० धावा झालेल्या असताना वूडनं माघारी धाडलं. रिषभ पंत (२१) आणि श्रेयस अय्यर (६७) यांनी भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. १०व्या ओव्हरमध्ये बेन स्टोक्सनं पंतला बेयरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर हार्दिक पंड्या (१९) आणि श्रेयस अय्यर यांनी ५४ धावांची भागीदारी करत भारताला १००चा आकडा गाठून दिला. हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर शार्दूल ठाकूर(०) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर (३) आणि अक्षर पटेल (७) यांनी भारताला १२४ धावांपर्यंत मजल मारून दिली.