इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यामध्ये भारतीय संघाचे सालामीचे तीन फलंदाज पहिल्या पाच षटकांमध्ये २० धावसंख्या असतानाच तंबूत परतले. पाच धावांचा पल्ला गाठेपर्यंतच चार चेंडूत एक धाव करुन परतलेला के. एल. राहुल आणि पाच चेंडूंमध्ये भोपळाही न फोडता विराट कोहली तंबूत परतला. त्यानंतर पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शिखर धवन माघारी परतला. २० धावांमध्ये तीन गडी तंबूत परतल्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने भारतीय संघाचा डाव सावरला. एकीकडे विकेट जात असतानाच दुसरीकडे ऋषभ मात्र त्याच्याच शैलीत खेळताना दिसला. भारताचे दोन गडी तंबूत परतलेले असताना पंतने लगावलेला एक षटकार सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने तर हा फटका क्रिकेटमधील सर्वोत्तम फटका असल्याचं सर्टीफिकेटही देऊन टाकलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng: पुन्हा एकदा शून्यच… कर्णधार म्हणून विराटच्या नावावर झाला नकोसा विक्रम

झालं असं की जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असणारा जॉफ्रा आर्चर हा सामन्यातील चौथे षटक टाकत होता. त्यावेळी षटकाच्या पाचव्या चेंडूवर पंत फलंदाजी करत होता. आर्चरने ९० मीटर प्रती तास वेगाने टाकलेला चेंडूवर पंतने चक्क रिव्हर्स स्वीप लगावला आणि चेंडू थेट स्टम्पच्या मागे षटकार गेला. हा फटका पाहून आर्चरच नाही तर इंग्लडचे अनेक खेळाडू आश्चर्याने पाहत राहिले.

पंतने लगावलेला हा फटका पाहून केविन पिटरसननेही ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. “काय फटका होता… क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत लगावण्यात आलेल्या सर्वोत्तम फटक्यांपैकी एक फटका नुकताच पंतने लगावला. आर्चर नव्या पांढऱ्या चेंडूने ९० मीटर प्रती तास वेगाने गोलंदाजी करत असताना पंतने रिव्हर्स स्वीप मारत षटकार लगावला आहे,” असं ट्विट पिटरसनने केलं आहे.

वासिम जाफरनेही पंतचं कौतुक केलं असून हे पंतचं जग आहे आपण फक्त त्यामध्ये जगतोय असं ट्विट केलं आहे.

खेळपट्टीवर थोडा स्थिर होत असतानाच पंत दहाव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर बेन स्ट्रोक्सच्या गोलंदाजीवर जॉनी बिस्ट्रोकरवी झेलबाद झाला. पंतने दोन चौकार एक षटकारासहीत २३ चेंडूत २१ धावा केल्या.