News Flash

Ind vs Eng T20 : शिखर धवन सलामीला येणार की नाही? विराट कोहलीने केलं स्पष्ट!

टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी सलामीला कोण येणार? यावर विराट कोहलीनं उत्तर दिलं आहे.

कसोटी मालिकेमध्ये साहेबांच्या संघाला ३-१ अशी धूळ चारल्यानंतर टीम इंडिया टी-२० मालिकेमध्ये इंग्लंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. कसोटी मालिकेत मिळालेल्या विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विराट कोहलीच्या संघासाठी टी-२० मालिकेची सुरुवात दणक्यात होणं आवश्यक असणार आहे. शिखर धवन देखील संघात असल्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये भारतीय डावाची सुरुवात कोण करणार? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. पण भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मनात याबाबत कोणताही संशय नसल्याचं त्यानं सामन्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केलं आहे.

…तरच शिखर धवनला संधी!

पत्रकारांशी बोलताना विराट कोहलीनं पहिल्या टी-२० सामन्यामध्ये भारताची काय रणनीती असेल, याविषयी सांगितलं. सलामीसाठी भारताकडे कसोटीमधला फॉर्म सोबत घेऊन येणारा रोहित शर्मा, भरवशाचा के. एल. राहुल आणि तडाखेबाज शिखर धवन असे तीन पर्याय आहेत. मात्र, विराट कोहली रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या जोडीवर ठाम आहे. “यामध्ये शंकाच नाही. हे फार सोपं आहे. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या जोडीने सलामीला सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. जर या दोघांपैकी कुणी माघार घेतली, तरच शिखर धवन सलामीला येऊ शकेल”, असं विराटनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शुक्रवारच्या पहिल्या लढतीत शिखर धवन सलामीला येण्याची शक्यता फारच कमी आहे.

अश्विनच्या समावेशाचीही शक्यता कमीच

दरम्यान, रवीचंद्रन अश्विनच्या संघातील समावेशाबद्दल देखील कॅप्टन कोहलीनं स्पष्ट केलं आहे. वॉशिंग्टन सुंदर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने फारच खराब कामगिरी केली, तरच अश्विनचा समावेश संघात होऊ शकतो, असं कोहली म्हणाला. त्यामुळे आर अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता देखील मावळली आहे.

आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेमधूनच अनेक खेळाडूंचं टी-२० वर्ल्डकपसाठीच्या संभाव्य संघामधलं स्थान पक्कं किंवा डळमळीत होणार आहे. त्यासोबतच दोन्ही संघांमध्ये तडाखेबाज फलंदाजांचा भरणा असल्यामुळे गोलंदाजांसाठी ही मालिका खडतर ठरण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 6:16 pm

Web Title: ind vs eng t20 series match rohit rahul will open for india virat kohli announces pmw 88
Next Stories
1 अभिमानास्पद! क्रिकेटपटू मिताली राज ठरली १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू!
2 पृथ्वीचा पुन्हा तडाखा!
3 विश्वचषकासाठी संघरचनेचे प्रयोग!
Just Now!
X