विस्फोटक ऋषभ पंत आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाचा डाव सावरला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. दिग्गज फलंदाज माघारी परतल्यानंतर पंतनं फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेतली. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी पाचव्या गड्यासाठी नाबाद ८१ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. चहापानापर्यंत भारतीय संघानं पहिल्या डावात ४ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप ४२४ धावांनी पिछाडीवर आहे. अनुभवी चेतेश्वर पुजारा ५३ धावांवर खेळत आहे. तर विस्फोटक ऋषभ पंत ५४ धावांवर खेळत आहे. पंतनं ४४ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि चार षठकाराच्या मदतीनं ५४ धावांचा पाऊस पाडला.

५७८ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचा ७४ धावात चार गडी तंबूत परतले होते. अशा परिस्थितीत पंत-पुजारा जोडीनं भारतीय संघाचा डाव सावरला. विराट कोहली (११), अजिंक्य राहणे (१) आणि रोहित शर्मा (६) यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आलं. युवा शुबमन गिल यानं २९ धावांची छोटेखानी खेळी केली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि डॉम बेस यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी मिळवले.

इंग्लंडचा ५७८ धावांचा डोंगर
इंग्लंड संघानं पहिल्या डावांत १९०.१ षटकांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला. जो रुटने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत द्विशतकी खेळी केली आहे. रुटनं ३७७ चेंडूत सर्वाधिक २१८ धावा केल्या. या खेळीत त्याने १९ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सने ८२ आणि डॉम सिब्लीने ८७ धावांची खेळी केली. भारताकडून बुमराह आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३-३ बळी मिळवले आहेत. तर इशांत आणि नदीम यांनी दोन-दोन बळी घेतले.