भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असणाऱ्या लीड्सवरील तिसऱ्या कसोटीमधील पहिल्या दोन दिवसांवर इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर भारताने कामगिरी उंचावत सामन्यातील रंगत टिकवून ठेवली आहे. मात्र हा सामना सुरु असतानाच एक विचित्र घटना शुक्रवारी घडली. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी धक्के मारत आणि बळजबरीने मैदानाबाहेर काढलं. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येणं अपेक्षित असतानाच भारतीय संघाला एक इंग्लीश चाहता हेल्मेट घालून, बॅट घेऊन विशेष म्हणजे तोंडाला मास्क लावून ६९ नंबरच्या जर्सीसहीत फलंदाजीला आला होता.

विशेष म्हणजे या चाहत्याने अशाप्रकारे पहिल्यांदाच मैदानामध्ये घुसखोरी केलेली नाही. तर त्याने लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यानही मैदानात अशीच घुसखोरी केलेली. या चाहत्याचं नाव जारवो ६९ असं आहे. लॉर्ड्सवरील घुसखोरीनंतर जारवोवर मैदान प्रशासनाने प्रवेश बंदीची कारवाई केलीय. आता हाच जारवो पुन्हा चर्चेत आळाय. मागच्या वेळेस क्षेत्ररक्षणाचा हट्ट करणारा जारवो यंदा फलंदाजीसाठी आला होता. रोहित बाद झाल्यानंतर विराटऐवजी इतर कोणीतरी मैदानात शिरल्याचं समजल्यानंतर सुरक्षारक्षकांनी मैदानामध्ये धाव घेतली आणि त्याला पकडून बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

लॉर्ड्स कसोटीमध्येही भारतीय संघाची जर्सी घालून हाच चाहता मैदानात शिरला होता आणि संघाचा एक भाग असल्याचे तो कर्मचाऱ्यांना सांगत होता. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. या चाहत्याच्या जर्सीच्या पाठीवर ‘जार्वो’ लिहिलेले होते. जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मैदानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने त्याच्या जर्सीवरील बीसीसीआयच्या लोगोकडे बोट दाखवले. बऱ्याच प्रयत्नानंतर या चाहत्याला बाहेर काढण्यात आले. या व्हिडिओमुळे अनेकांना हसू आवरलं नाही तर दुसरीकडे दुसरीकडे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे म्हटलं होतं. आकाश चोप्रा यांनी, ‘खूप चिंताजनक. कोविडचा काळ पाहता अधिक विचार करण्याची गरज आहे. हे कसे होऊ दिले? ‘, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारतीय संघ लंच ब्रेकनंतर मैदानावर परतत असताना लॉर्ड्सवर ही घटना घडली होती. सध्या सुरु असणाऱ्या कसोटी सामन्याबद्दल सांगायचं झाल्यास चेतेश्वर पुजारा (खेळत आहे ९१), सलामीवीर रोहित शर्मा (५९) आणि कर्णधार विराट कोहली (खेळत आहे ४५) या त्रिमूर्तीच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली आहे.