भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने सामन्यावर मजबूत पकड घेतली. भारताचा पहिला डाव ३२९ धावांत आटोपल्यावर भारताने इंग्लंडचा डाव केवळ १६१ धावांत गुंडाळला. कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताचे वर्चस्व पाहायला मिळाले. विराट कोहलीच्या ९७ आणि अजिंक्य रहाणेच्या ८१ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३२९ धावापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज भारतीय गोलंदाजांच्या चमकदार कामिगिरीने इंग्लंडचा डाव गडगडला. या डावात हार्दिक पंड्याची गोलंदाजी लक्षवेधी ठरली.

इंग्लंडच्या पहिल्या डावात हार्दिकने ५ बाली टिपले. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याच्या या कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ अवघ्या १६१ धावांत गारद झाला. पण मुख्य म्हणजे एकूण ६ षटके त्याने फेकली असली, तरी त्याने ५ बळी टिपण्याची कामगिरी केवळ २९ चेंडूत केली. पहिल्या षटकात त्याला गडी बाद करता आला नाही. मात्र त्या नन्तर त्याने झटपट इंग्लंडचे ५ गडी तंबूत धाडले. हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांचे धाबे दणाणले. जो रूट (१६), जॉनी बेअरस्टो (१५), ख्रिस वोक्स (८), आदिल रशीद (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) या पाच फलंदाजांना त्याने बाद केले. या आधी हार्दिकची गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी ३ बाद ६६ धावा अशी होती.

इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजानी संघाची धावसंख्या बिनबाद ५० पर्यंत पोहोचवली होती. पण त्यानंतर इशांत शर्माने अॅलिस्टर कुकला, तर जसप्रीत बुमराने जेनिंग्सला तंबूचा रस्ता दाखवला. पोप आणि कर्णधार जो रुट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, इशांतने पोपला बाद केले. त्या नन्तर हार्दिकच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघेच टेकले.