तिसऱ्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर मैदानात उतरलेल्या इंग्लडच्या खेळाडूंनी चौथ्या सामन्यातही सपशेप लोटांगण घेतलं. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि आर. आश्विन यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ टिकाव धरू शकला नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ २०५ धावांवरच गारद झाला. बेन स्टोक्स वगळता एकाही खेळाडूनला जम बसवता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ गडी बाद केले. दरम्यान, भारताचाही सुरूवात निराशाजनक झाली. शून्य धावसंख्या असतानाच शुभमन गिल बाद झाला.

झटपट संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामुळे चर्चेत असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि डॉमिनिक सिब्ले डावाची सुरूवात केली. मात्र, सलामी ही जोडी फार काळ मैदानात दम धरू शकली नाही. अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच षटकात सिब्लेला त्रिफळाचित केलं. सिबलेला पाठोपाठ अक्षरने दुसरा सलामीवीर झॅक क्रॉलीला टिपलं. झॅक केवळ ९ धावा करून परतला.

त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटही फार काळ मैदानात तग धरू शकला नाही. मोहम्मद सिराजने जो रुटचा अडथळा दूर केला. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तर डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकीचा जलवा दाखवला. भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर आर अश्विनने ३ बळी घेत साथ दिली. तसेच मोहम्मद सिराजनेही इंग्लंडच्या २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

इंग्लंडचा संपूर्ण संघ २०५ धावांवर बाद झाल्यानंतर भारताकडून सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरूवात केली. मात्र, डाव्याच्या पहिल्याच षटकात जेम्स अंडरसनने शुभमनला बाद केलं. भारताची धावसंख्या शून्य असतानाच गिल तंबूत परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मानं सावध सुरूवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या एक बाद २४ इतकी होती. रोहित शर्मा १५ धावा, तर चेतेश्वर पुजारा ८ धावांवर खेळत आहे.