विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याचा मैदानावरील आक्रमकपण सर्वश्रृतच आहे. पण कधीकधी तो शांत राहून समोरच्या व्यक्तीला शांत करतो. असेच काहीसे त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केले आहे. पहिल्या कसोटीत विराट शून्यावर बाद झाला. यानंतर एका पत्रकाराच्या लांबलचक प्रश्नाला त्याने एका शब्दात उत्तर दिले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने कोहलीला याबद्दल प्रश्न विचारला. ”विदेशी दौऱ्यात त्यातही इंग्लंड दौऱ्यावर तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत, त्यामुळे तू आपली कामगिरी सुधारण्यासाठी यावेळी काही अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करत आहेस का?”, असा प्रश्न त्या पत्रकाराने विराटला विचारला.

 

यानंतर विराटने उदासीन चेहऱ्याने ‘नाही’ असे उत्तर दिले. विराट या पत्रकाराच्या प्रश्नावर रागावला असल्याचे दिसून येत होते. विराटच्या उत्तराने पत्रकारही नि:शब्द झाला.

 

 

हेही वाचा – नीरज असेल ऑलिम्पिक चॅम्पियन; पण त्याच्याबरोबर रूम शेअर करणं म्हणजे… मित्रानं व्यक्त केली भावना

पावसामुळे पहिली कसोटी अनिर्णीत

भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहममधील पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. पण पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. चहापानानंतर पावसाने अधिक जोर धरल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात अर्धशतकी आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. चौथ्या दिवसअखेर भारताने १ बाद ५२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने तंबूचा मार्ग दाखवत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२ धावांवर नाबाद होते.