इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसरे सत्र संपेपर्यंत ४१६ धावांची आघाडी घेतली. गोलंदाजीला मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर भारताचे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा धैर्याने सामना केला. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला चांगला आकार दिला. विराट कोहली ६२ धावांवर बाद झाला पण अश्विनने खेळपट्टीवर तळ ठोकत संघाला चहापानापर्यंत ८ बाद २२१ पर्यंत नेले.

दुसऱ्या दिवशी सलामीवीर शुबमन गिल(१४) बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाले. रविचंद्रन अश्विनने ज्या फिरकीच्या जोरावर दुसऱ्या दिवशी इंग्लंडला उद्ध्वस्त केलं, त्याच फिरकीने तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना हादरवून सोडलं. चांगल्या लयीत असलेला चेतेश्वर पुजारा (८) कमनशिबी ठरला आणि धावबाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (१०), ऋषभ पंत (८) आणि अक्षर पटेल (७) यांची इंग्लंडच्या फिरकीपटूंनी शिकार केली.

Ind vs Eng Video: रोहित – पंत यांच्यात मैदानावर राडा? पाहा नक्की काय झालं…

कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी रविचंद्रन अश्विन यांनी खेळपट्टीवर तग धरला आणि भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी केली. कर्णधार विराट कोहली १४९ चेंडूत ७ चौकारांसह ६२ धावांवर पायचीत झाला. त्यानंतर अश्विनने तळाच्या फलंदाजांना घेऊन सत्र संपेपर्यंत खेळपट्टी सांभाळली.

Ind vs Eng Video: कमनशिबी पुजारा! ‘अशा’ विचित्र पद्धतीने झाला बाद

त्याआधी, रोहित शर्माच्या दीडशतकी (१६१) खेळीच्या जोरावर पहिल्या डावात भारताने ३२९ धावांपर्यंत मजल मारली. फिरकीपटू मोईन अलीने ४ बळी टिपले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव अश्विनच्या ५ बळींच्या जोरावर १३४ धावांवर आटोपला. बेन फोक्सने एकाकी झुंज देत ४२ धावांची नाबाद खेळी केली.