भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या टी-20 सामना खराब अंपायरिंगमुळे सध्या चर्चेत आहे. या सामन्यात इंग्लंडला आठ धावांनी धुळ चारत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. पण, सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने खराब अंपायरिंगवर बोट ठेवलं. जर खेळाडूला स्वतःला माहित नाहीये की त्याने कॅच पकडला आहे की नाही, तर मैदानावरील पंच आउट असा सॉफ्ट सिग्नल कसा देऊ शकतात, असं म्हणत विराटने सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयावर टीका केली.

मॅच संपल्यानंतरच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना विराट म्हणाला की, “आधी कसोटी मालिकेत असाच प्रकार झाला होता, तेव्हा अजिंक्य रहाणेने कॅच पकडला होता, पण त्याला पूर्ण खात्री नव्हती….जेव्हा क्लोज कॉल असतात तेव्हा सॉफ्ट सिग्नल खूप मह्त्त्वाचे ठरतात. मला कळत नाही की मैदानावरील पंच सॉफ्ट सिग्नल देताना मला माहित नाही (I Don’t Know) असं का नाही सांगू शकत. सॉफ्ट सिग्नल निर्णायकच का हवा…त्याचा (डीआरएसच्या अंपायर कॉल नियमाप्रमाणे) सगळ्या निर्णयावर परिणाम होत असतो… मैदानावरच सर्व स्पष्ट असणं महत्त्वाचं आहे”, अशा शब्दात विराटने सॉफ्ट सिग्नलविरोधात नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, भारताच्या डावात पंचांचे दोन निर्णय वादग्रस्त ठरले. सूर्यकुमार यादवचा कॅच पकडताना डेव्हिड मलानकडून चेंडू जमिनीला स्पर्श झाल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. पण तिसऱ्या पंचांनी ठोस पुरावा नसल्याचं सांगत सॉफ्ट सिग्नलच्या आधारे सूर्यकुमारला बाद दिलं. तर, भारताच्या फलंदाजीच्या अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने अप्पर कट मारलेला फटका आदिल रशीदने थर्ड मॅनला सीमारेषेजवळ पकडला. हा कॅच पकडतानाही रशीदचा पाय सीमारेषेला स्पर्ष होत झाल्याचं रिप्लेमध्ये दिसत होतं, पण तिसऱ्या पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउटच्या आधारे सुंदरलाही आउट दिलं. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी अहमदाबादमध्येच होणार आहे.