Ind vs Eng : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा २०३ धावांनी दारूण पराभव केला.  या विजयाबरोबरच भारताने मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात सामनावीर ठरलेल्या कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे. विराटने कर्णधार म्हणून कसोटी कारकिर्दीतील आपला २२ वा सामना जिंकला आहे. या कामगिरीसह विराटने सौरव गांगुलीचा विक्रम मोडीत काढला आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने २१ कसोटीत विजय मिळवला होता.

विराट आता कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा अव्वल स्थानी आहे. त्याने २७ सामन्यांत भारताला विजय मिळवून दिला आहे.

विराटने आत्तापर्यंत ३८ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. यात २२ विजय आणि ७ पराभवांचा समावेश आहे, तर ९ सामने अनिर्णित राहिले आहेत. कसोटीतून निवृत्ती घेतलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ६० कसोटीत २७ सामने जिंकले आहेत. तर गांगुलीने ४९ कसोटीत नेतृत्व करताना २१ विजय मिळवले आहेत.