इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यावर भारतीय संघ निराश झाला आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची आवश्यकता होती, शिवाय हातात ९ फलंदाज होते. पण पावसामुळे पाचवा दिवस वाया गेला. त्यामुळे भारताच्या तोंडाशी आलेला विजयी घास हिरावला गेला. सामना ड्रॉ झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनेही आपली निराशा व्यक्त केली.

विराट कोहली म्हणाला, ”आम्ही विचार करत होतो, की तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पाऊस पडेल. पण पाचव्या दिवशी जेव्हा आम्ही आव्हान गाठणार होतो. आम्हाला मजबूत सुरुवात करायची होती आणि पाचव्या दिवशी आम्हाला वाटले, की आम्हाला संधी आहे. या सामन्यात आम्ही चांगल्या स्थितीत होतो आणि पाचव्या दिवशी एकही चेंडू खेळववला गेला नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत ५० धावा केल्या होत्या, जी आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट होती. आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करत नव्हतो, पण आखुड चेंडू सापडताच आम्ही त्याला सीमापार करत होतो.”

हेही वाचा – VIDEO : Good bye करताना मेस्सीला अश्रू अनावर..! जाता जाता मानधनाविषयी केला ‘मोठा’ खुलासा

विराट कोहलीनेही सामन्यानंतर त्याच्या शेपटाकडील फलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला, ”आमच्या फलंदाजांनी नेटमध्ये कसून सराव केला आणि त्यांच्यामुळे आम्ही ९५ धावांची आघाडी घेतली. मला वाटते, की त्यांनी अप्रतिम फलंदाजी केली. गेल्या ३ आठवड्यांत केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.”

जो रूटला सामनावीर पुरस्कार

शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. पण पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. चहापानानंतर पावसाने अधिक जोर धरल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात अर्धशतकी आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. चौथ्या दिवसअखेर भारताने १ बाद ५२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने तंबूचा मार्ग दाखवत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२ धावांवर नाबाद होते.