राज्यातली करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत व इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सीरिजमधील एकदिवसीय सामने महाराष्ट्रात होणार की नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) याबाबतची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील सामन्यासाठी हिरवा कंदील दर्शवला आहे. मात्र, ही परवानगी देताना त्यांनी अट देखील टाकली आहे.

महाराष्ट्रामधील सामन्यांसाठी आज महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर व मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग कॉन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी भारत व इंग्लंडमधील एकदिवसीय सामने महाराष्ट्रात होऊ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या सामन्यांसाठी हिरवा कंदील तर दर्शवला मात्र अट देखील टाकली आहे.

पुण्यात होणारे हे तिन्ही सामने विनाप्रेक्षक खेळवले जातील, असं सांगण्यात आलं आहे. पुण्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळाल्याने आता महाराष्ट्रात क्रिकेट सामने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अन्य परवानग्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन कामाला लागील असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर २३, २५ व २८ मार्च रोजी तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. हे सर्व सामने दिवस-रात्र खेवळवण्याता येणार आहेत. करोनाविषयक नियमांचं पालन करून व प्रेक्षकांविना या सामन्यांचं पुण्यात आयोजन करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी देण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला.